नेहाच्या मारेकऱ्याला फाशी द्या, सकल हिंदू समाजा आयोजित हिंदू जनआक्रोश मोर्चात महिलांची मागणी
नेहाच्या कुटुंबीयाच्या जिवाला धोका असून त्यांना पोलिस संरक्षण द्यावे : सुधीर बहिरवाडे (आयोजक, हिंदू जनआक्रोश मोर्चा)

सोलापूर : प्रतिनिधी
कर्नाटकातील नेहा हिरेमठ हिची हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, नेहाला व तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा आणि आरोपीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशा घटना होऊ नये यासाठी कडक कायदे करण्याची मागणी करत सोलापुरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने शुक्रवारी मोर्चा काढला.
सौंदत्ती (कर्नाटक) या ठिकाणी नेहा हिरेमठ हिची निघृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली. त्याच्या निषेधार्थ ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत. नागणसूरचे श्रीकंठ शिवाचार्य स्वामी, मैंदर्गीचे नीलकंठ शिवाचार्य स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत मोर्चास मल्लिकार्जुन मंदिरापासून प्रारंभ झाला. तेथून हा मोर्चा पंजाब तालीम, चौपाड, शिंदे चौक, लकी चौक, मार्गे हुतात्मा पुतळा चौक येथे आले. तेथून या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.
दरम्यान, यावेळी तेथील सरकारच्या विरुद्ध घोषणा देण्यात आल्या. नेहाच्या कुटुंबीयाच्या जिवाला धोका आहे. यामुळे त्यांना पोलिस संरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी सुधीर बहिरवाडे यांनी केली. यावेळी युवराज सरवदे, अक्षय वायकर, कंदलगावकर, अभिजीत जाधव, सिध्देश्वर पाटील, प्रवीण सरवदे आदींनी मोर्चासाठी नियोजन केले. या मोर्चात सकल हिंदू संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.