उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांच्या हस्ते नुतन न्यायालयीन इमारतीचे भूमिपूजन

सोलापूर : प्रतिनिधी
21 जुलै रोजी बार्शी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नविन इमारतीचा भूमिपूजन समारंभ मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या शुभहस्ते सकाळी १०.३० वाजता पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला उपस्थित राहतील. जिल्हा व सत्र न्यायाधीश मो. सलमान आझमी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश, बार्शी, माढा, आणि करमाळा या तालुक्यातील पक्षकार, जनता, आणि विधिज्ञ या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे निमंत्रक बार्शीचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. के. मांडे आणि बार्शी वकिल संघाचे अध्यक्ष अॅड. काकासाहेब गुंड (लाडोळेकर) यांनी या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
बार्शी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या बांधकामाचा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित होता. बार्शी वकिल संघ आणि आजी-माजी लोकप्रतिनिधी यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे. न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या बांधकामाची निविदा प्रसिद्ध होऊन ठेकेदारास देण्यात आले आहे.
सदर भूमिपूजनाचा कार्यक्रम बार्शीच्या गाडेगाव रोड, औद्योगिक प्रशिक्षण केंद्राजवळ (ITI) होणार आहे. त्यानंतर मुख्य सोहळा त्रिवेणी मंगल कार्यालय (लॉन्स), बार्शी-लातूर बायपास रोड येथे होणार आहे. बार्शी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे कामकाज सध्या जुन्या इमारतीत चालू आहे. या जुन्या इमारतीत ९ न्यायालयांचे कामकाज चालते. परंतु, सध्याची जुनी इमारत ही अपुरी पडत असल्याने काही न्यायालयांसाठी बार्शी नगरपरिषद व शेतकरी निवासाच्या काही इमारती भाड्याने घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे नवीन इमारत अत्यंत आवश्यक होती. या नव्या इमारतीमुळे बार्शी, माढा, व करमाळा येथील सर्व पक्षकार व विधिज्ञांची सोय होणार असून सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.
हा समारंभ बार्शीतील न्यायालयीन व्यवस्थेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या नव्या इमारतीमुळे न्यायालयाचे कामकाज अधिक सुव्यवस्थित आणि प्रभावी होईल अशी अपेक्षा आहे. बार्शीतील जनता आणि विधिज्ञांनी या समारंभात मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.