
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूरातील विविध ३ मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रामक आक्रोश मोर्चा काढण्यात येऊन जिल्हाधिकारी यांना खालील मागण्यांसाठी निवेदन देण्यात येणार आहे.
सो.म.पा. आरोग्याधिकारी डॉ. राखी माने यांना निलंबित करून त्यांची नियुक्ती रद्द करणेबाबत.
सोलापूर महानगरपालिका आरोग्याधिकारी पदी डॉ. राखी माने यांची जी प्रतिनियुक्ती करण्यात आलेली आहे ती चुकीची व बेकायदेशीर आहे. सदरची प्रतिनियुक्ती मुख्यमंत्र्यांचे उपसचिव अनिरूध्द जेवळगीकर यांनी केलेली आहे. तरी या संदर्भात सर्व नियमांना धाब्यावर बसवून डॉ. राखी माने यांना प्रतिनियुक्ती देण्यात आलेली आहे. त्यासाठी उपसचिवांनी केलेल्या कारनाम्यांची चौकशी होणे सुध्दा गरजेचे आहे. डॉ. राखी माने यांची प्रतिनियुक्ती केल्याने सोलापूरकरांचे आरोग्य धोक्यात येणार असून आरोग्याधिकारी पदासाठी “MBBS-DPH”, “MBBS- MPH” व “MDPSM” ही पदवी घेणे आवश्यक आहे. परंतु डॉ. राखी माने या “MBBS-ENT” आहेत. असे असतांना सुध्दा आरोग्याधिकारी पदाचा पदभार घेतलेला आहे. MDPSM ही पदवी सदर पदासाठी आवश्यक असतांना डॉ. राखी माने यांची पदवी MBBS-ENT असल्याने ते या पदासाठी पात्र नाही म्हणून या पदावर त्यांची नियुक्ती नियमाप्रमाणे करता येत नाही. डॉ. राखी सुहास माने (MBBS-ENT) यांची प्रतिनियुक्ती केल्याने सोलापूर शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. तसेच सदर पदासाठी किमान ७ वर्षांचा अनुभव असावा लागतो. तसेच बायोमेडिकल वेस्ट प्रकरणात सदर एस. एस. सर्व्हिसेस कंपनीकडे प्रदुषण खात्याची परवानगी सुध्दा नसतांना डॉ. राखी माने यांनी सदर कंपनीवर कोणतीही कारवाई केली नाही. तरी डॉ. राखी माने यांना बेकायदेशीरपणे आरोग्याधिकारी पदाचा पदभार देण्यात ज्या-ज्या अधिकाऱ्यांनी भूमिका बजावली त्या सर्वांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे. तसेच बायोमेडिकल वेस्टेज चे काम पाहणारी एस.एस. सर्व्हिसेस या कंपनीवरही तात्काळ कारवाई करावी व डॉ. राखी माने यांची बेकायदेशीर नियुक्ती रद्द करून त्यांना निलंबित करावे व उपसचिव अनिरूध्द जेवळगीकर यांची खातेनिहाय चौकशी करावी.
लक्ष्मी विष्णू मिल कामगारांना मिलच्या जागेत घरे देणेबाबत.
सोलापूर शहरातील जवळपास ३२०० कामगार हे लक्ष्मी विष्णू मिल येथे कार्यरत होते. कालांतराने लक्ष्मी-विष्णू मिल बंद पडली आणि कामगारांच्या हाताचे काम गेले. पण मिल बंद करतांना नियमांना धाब्यावर बसवून मिल बंद करण्यात आली आणि त्याची करोडो रुपयांची जागा कवडीमोल भावात विकण्यात आली आहे पण कामगारांना त्यांची देणे, व इतर न देता कामगारांवर अन्याय केलेला आहे. तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने लक्ष्मी विष्णू मिल कामगारांना घरे बांधून देण्याकरिता ठराव क्र.२८२ दि.१०/१२/२०१६ नुसार ठराव करण्यात आलेला आहे. परंतु आजतागायत सदर ठरावावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही. लक्ष्मी विष्णू मिल कामगार आजही आपल्या हक्काच्या घरापासून वंचित आहेत. गेल्या २८ वर्षापासून लक्ष्मी विष्णू मिल कामगार आपल्या हक्कासाठी लढत आहेत. राज्य शासन, जिल्हाधिकारी, व महापालिकेशी कामगारांनी वारंवार पत्रव्यवहार करून अनेक निवेदने दिली, आंदोलने केली, परंतु याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. तरी माननीय जिल्हाधिकारी यांना कळकळीची विनंती की, सदर लक्ष्मी विष्णू मिल कामगारांच्या घरांचा प्रश्न सोडवून त्यांना तातडीने घरे बांधून देणेबाबत राज्य शासनास कळविण्यात यावे.
मराठा व मुस्लिम समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण देणेबाबत
सध्या राज्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्न पेटलेला असून त्यात मुस्लिम आरक्षणाची मागणी जोर धरू लागलेली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही प्रहारची मागणी असून मुस्लिम समाजालाही जे ५ टक्के आरक्षण देण्यात आलेले आहे त्याची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी. मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण देऊन सदर दोन्ही प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावेत.
या सर्व मागण्यांसाठी बुधवार दि.२४ जुलै २०२४ रोजी सोलापूरातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या रंगभवन येथील कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हलगीनाद करत आक्रोश मोर्चा काढण्यात येऊन जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांना निवेदन देण्यात येणार आहे.
या पत्रकार परिषदेस प्रहारचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के-पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख जमीर शेख, शहर कार्याध्यक्ष खालीद मनियार यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.