सोलापुरात उद्या युवा उद्योग प्रशिक्षण कार्यशाळा, ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर यांचा सन्मान

सोलापूर : प्रतिनिधी
माजी राष्ट्रपती भारतरत्न मिसाईलमॅन डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्या नवव्या पुण्यतिथी निमित्त ड्रीम फाउंडेशन, डॉ. कलाम कौशल्य विकास केंद्र, बसव संगम शेतकरी गट व चाणक्य आयएएस गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरात युवा उद्योजक प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती संयोजक काशिनाथ भतगुणकी यांनी पत्रकार परिषदेत दिली. बुधवारी ३१ जुलैला सकाळी ११ वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांचा डॉ. अब्दुल कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. शशरण बसवलिंग शिवयोगी महास्वामी, श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
संस्कार क्रांती ज्ञान सत्रांतर्गत यावेळी प्रमुख वक्ते शिवचरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे यांचे व्याख्यान होणार आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रदीपसिंह रजपूत, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी दत्तात्रय कोहिनकर, बालाजी अमाईन्सचे राम रेड्डी, एम. के. फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेस अरुणकुमार तळीखेडे, काकासाहेब काशीद आदी उपस्थित होते.