महापालिका पेन्शनर संघटनेचे विविध मागण्यांसाठी उपोषण

सोलापूर : प्रतिनिधी
महापालिका पेन्शनर संघटनेच्यावतीने विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेसमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले. सोलापूर महानगरपालिकेत ३५ ते ४० वर्षे सेवा करुनही सेवानिवृत्त झाल्यानंतर दरमहा पेन्शन सुरु करण्यास सुमारे ४ ते ६ महिने लागतात. ग्रॅच्युईटी, पेन्शन विक्री कित्येक वर्षे दिली जात नाही. सध्या सुमारे ४ हजार ५०० पेन्शनर आहेत. त्यापैकी किमान ६० ते ७० टक्के चतुश्रेणीचे बिगारी, सफाई कामगार आहेत.
चौथ्या वेतन आयोगाच्या वेळी ७ दिवस संप झाला होता. त्यावेळी महानगरपालिका आयुक्त व संघटना यांच्याबरोबर चर्चा होऊन १२ मे १९७८ रोजी करार झालेला असून सेवकांना वेळोवेळी वेतन आयोग, महागाई भत्ता, इतर सुविधा लागू होतात. त्या सोलापूर महानगरपालिका सेवकांना तंतोतंत लागू करण्याबाबत करार केला होता. प्रत्यक्ष फरक देण्यास विलंब लावला जातो, असा आरोप केला आहे.
शासन नियमा प्रमाणे ५० टक्के महागाई भत्ता लागू करावा. फरकासह रक्कम द्यावी. ज्येष्ठ सेवानिवृत्तांना ८० वर्षांपुढील वाढीव पेन्शन लागू करून फरक अदा करावा. सातव्या वेतन आयोगाच एक वर्षाचा फरक मिळावा. पाच, सहा आणि सातव्या वेतन आयोगाचा फरक द्यावा आदी मागण्यांसाठी हे साखळी उपोषण करण्यात येत आहे. १५ ऑगस्टपर्यंत निर्णय न झाल्यास आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी निवृत्त सहायक आयुक्त जाधव, संजय जोगदनकर, म. रौफ बागवान, प्रदीप थडसरे, पी. व्ही. कांगरे, आर. पीठ गायकवाड, सी. के. खेडगीकर आदींसह सेवानिवृत्त कर्मचारी- अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.