मनोज जरांगे पाटलांकडून समाजकारणा ऐवजी आता राजकारण, नरेंद्र पाटील यांचा आरोप

सोलापूर : प्रतिनिधी
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत विविध विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली.
मराठा आरक्षणासाठी लढाईचा प्रवास हा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केला नाही तर आण्णासाहेब पाटील यांनी 1980 पासून तो सुरू केला आहे. त्यानंतर अनेक मान्यवरांनी यासाठी पाठपुरावा केला आहे. मात्र यापूर्वीच्या काळात दोन समाजात वाद निर्माण केला गेला नव्हता. तशी वक्तव्यही केली जात नव्हती. कालपर्यंत जरांगे पाटील हे समाजकारण करत होते. आज ते राजकारण करत आहेत. पाडापाडीचे राजकारण हाती घेतले आहे. ज्या सरकारच्या काळात कुणबी प्रमाणपत्र शोधून दिले. त्याच सत्ताधारी सरकारमधील एका पक्षाच्या नेत्याला टार्गेट केले जात आहे. विशिष्ट पक्षाच्या विरोधात आंदोलने केली जात आहेत असा आरोप करतानाच आता मराठा समाज सावध झाला आहे. मनोज जरांगे पाटील हे एका व्यक्तीला टार्गेट करत आहेत. त्यांच्या मागे बोलवता धनी कोण हे शोधावे, असेही अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
केंद्राने दिलेले ईडब्ल्यूएस आरक्षण मराठा समाजाच्या हिताचे
केंद्र सरकारने दिलेले ईडब्ल्यूएस 10 टक्के आरक्षण हे मराठा समाजाच्या हिताचे आहे. केंद्रस्तरावर मोठ्या प्रमाणात याचा मराठा समाजाला लाभ होऊ शकणार आहे, असेही यावेळी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितले.