१ लाख मराठा उद्योजक संकल्पपूर्ती निमित्त शनिवारी मराठा उद्योजकांचा मेळावा, नरेंद्र पाटील यांची माहिती

सोलापूर : प्रतिनिधी
राज्यात मराठा उद्योजक घडावेत या उद्देशाने १ लाख मराठा उद्योजक संकल्पपूर्ती निमित्त अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व लोकमंगल बँक यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. २१ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ठीक १० वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे मराठा उद्योजक मेळावा आणि लाभार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे, अशी माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनाच्या माध्यमातून आज पर्यंत १ लाख ५ हजार ९३६ लाभार्थी तयार झाले असून, ८८७५ कोटी रुपये विविध बँकेनी कर्ज वितरीत केले आहे. त्यापैकी महामंडळाने ८५९ कोटी व्याज परतावा केला आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात १० हजार ५० एवढे लाभार्थी झाले असून, ८०३ कोटी रुपये विविध बँकांनी कर्ज वितरीत केले आहे. त्यापैकी महामंडळाने ७८ कोटी पेक्षा जास्त व्याज परतावा केला आहे. महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मंत्र्यांबरोबर शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी, राष्ट्रीयकृत बँक, खाजगी बँक व सहकारी बँकांचे प्रमुख, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, अधिकारी- कर्मचारी, लोकप्रतिनिधी, लाभार्थी यांचे तसेच अन्य संबंधीतांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त केले.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात १ लाखापेक्षा जास्त मराठा उद्योजक संख्या पूर्ण झाली. जिल्ह्यातील सर्व मराठा बांधव व मराठा उद्योजक यांच्या पर्यंत ही योजना पोहोचावी या उद्देशातून हा मेळावा आयोजित केला आहे. यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील , आ. सुभाष देशमुख आदींसह अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
महामंडळाच्या माध्यमातून आता यापुढे पाच लाखाचा टप्पा पार पाडायचा आहे. महामंडळाचे ऑनलाईन कामकाज सुरू आहे. मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे माहिती मिळू शकणार आहे. भविष्यात कॉल सेंटर तयार करण्याचा मानस आहे. या माध्यमातून फोनवरूनच लाभार्थ्यांना माहिती मिळू शकेल. त्यांच्या शंकाचे निरसन होऊ शकणार आहे. त्याचबरोबर महामंडळाचे स्वतःचे सॉफ्टवेअर तयार करण्यात येणार आहे, असेही अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस अनंत जाधव, अर्जुन चव्हाण, शिवाजी मोरे, स्वानंद कोडूरीकर, किरण पवार आदी उपस्थित होते.