छत्रपती संभाजीराजे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
६ जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्या संदर्भात भेट

मुंबई : प्रतिनिधी
प्रतिवर्षी प्रमाणे याहीवर्षी ६ जून रोजी किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येणार आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन केले जाते. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.
यावर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्यास ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे देशभरातून जवळपास पाच लाखांहून अधिक शिवभक्त ६ जून रोजी रायगडावर येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यादृष्टीने शिवभक्तांच्या सोयीकरिता विविध उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाची मदत लागणार असून आवश्यक बाबींची मागणी करणारे निवेदन यावेळी संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिले.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्याच सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणांची बैठक बोलावून योग्य ते निर्देश देण्याचे आश्र्वासित केले.