खटला पोलीसी अत्याचाराचे उदाहरण न्यायालयाचे निरीक्षण, खान-चाचा हॉटेल मालकासह 11 जणांची निर्दोष मुक्तता

सोलापूर : प्रतिनिधी
पो.शि.अमोल सुरेश बेगमपुरे वय 39 रा विद्यानगर शेळगी सोलापूर यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न तर एकास जखमी केल्या प्रकरणी हॉटेल खान चाचा चे मालक सलमान खान वय 30, रिहान खान वय 32, अल्ताफ पठाण वय 22, मोहम्मद अन्सारी वय 24, मोजाहिद अन्सारी वय 24, अन्वर जोडगे वय 26, सिद्धेश्वर हेडगे वय 29, सैफन मुलाणी वय 24, सादिक शेख वय 40, मोहसिन शेख वय 23, शाहनवाज सय्यद वय 31 यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे यांच्यासमोर होऊन त्यांनी गुन्हा शाबीत न झाल्याने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
या हकीकत अशी की, 10-10-2020 रोजी पो.शि.अमोल बेगमपुरे हा अश्विनी हॉस्पिटल येथे त्याच्या चुलत बहिणीस पाहण्यासाठी गेला होता. तेथे त्याचा चुलत भाऊ शशिकांत बेगमपुरे हा देखील हॉस्पिटलमध्ये बहिणीस पाहण्यासाठी आला होता.
साधारण 10:30 ते 10:45 च्या सुमारास अमोल व शशिकांत यांना भूक लागल्याने ते काहीतरी खाण्यास बाहेर पडले आजूबाजूचे हॉटेल बंद होते, त्यामुळे ते हॉटेल खान चाचा येथे आले त्यांनी हॉटेल मालक सलमान व रिहान यांना जेवणासाठी पार्सल देण्यास सांगितले, त्यावर हॉटेल मालक सलमान व रिहान यांनी अरे रावी ची भाषा वापरून त्यांनी व इतरांनी अमोल यास लाकडी दांडके, लोखंडी रॉडने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला अशा आशयाची फिर्याद अमोल याने सदर बझार पोलीस स्टेशन येथे दिली होती. त्यावरून पोलिसांनी तपास करून आरोपीविरुद्ध दोषारोप पत्रक दाखल केले होते.
यात सरकार पक्षातर्फे एकंदर नऊ साक्षीदार तपासण्यात आले. खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस आरोपींचे वकील ॲड.मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तीवादात आरोपी सलमान व रिहान यांना झालेल्या जखमांचा खुलासा सरकार पक्षाने केला नाही तसेच पोलीसांना जेवण न दिल्यामुळे त्यांनी चिडून हॉटेल मालकांना मारहाण केली आणि स्वतःवर केस होण्यापूर्वी आरोपींविरुद्ध केस दाखल केल्याचे दिसते असा युक्तिवाद मांडला, यावरून न्यायालयाने प्रस्तुतचा खटला हा पोलीसी अत्याचाराचा जिवंत नमुना दिसतो असे नमूद करून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
यात आरोपींतर्फे ऍड.मिलिंद थोबडे, ऍड.निशांत लोंढे यांनी तर सरकारतर्फे ऍड. दत्तूसिंग पवार यांनी काम पाहिले.