बंद गिरणी कामगारांच्या वारसांना महामहीम राष्ट्रपतींच्या हस्ते हक्काचे घर मिळवून देणार, आडम मास्तर यांची ग्वाही
बंद गिरणी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

सोलापूर : प्रतिनिधी
कॉ. नारायणराव आडम हे गिरणी कामगार होते. आयुष्यभर कामगारांसाठी आपले त्यांनी जीवन वेचले. त्यांनी दिलेल्या लढ्याचा वारसा घेऊन मी बंद गिरणी कामगारांच्या वारसांना हक्काचे घर मिळावे याकरिता शासन दरबारी लढत आहे. ज्यांनी सोलापूरच्या अर्थव्यवस्थेला गती देण्या कामी आणि सोलापूरचे नाव सातासमुद्रापार नेण्यासाठी योगदान दिले अशा बंद गिरणी कामगारांच्या वारसाला 12 जानेवारी 2025 रोजी हौतात्म्य दिनी महामहीम राष्ट्रपती यांच्या हस्ते हक्काचे घर मिळवून देण्याचा निर्धार ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांनी केला.
गुरुवार 26 सप्टेंबर रोजी दत्त नगर येथील संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय येथे स्वातंत्र्य सैनिक कॉ.नारायणराव आडम बंद गिरणी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्था सोलापूर ची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे सदस्य गोपाळ बार्शीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वार्षिक सर्वसाधारण सभेची सुरुवात कॉ. नारायणराव आडम व कॉ.सीताराम येचुरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
ते बोलताना पुढे म्हणाले की गिरण्या बंद पडल्यावर गिरणी कामगारांची जी वाताहत झाली ती अत्यंत भीषण होती. मिळेल ते काम करून कुटुंबाचे उदरनिर्वाह चालविले. कित्येक जण बेघर झाले. अशा बेघर गिरणी कामगारांच्या वारसांना सिटू ची भक्कम साथ राहील आणि आगामी विधानसभा निवडणुकीत बंद गिरणी कामगार आपल्या हक्काच्या घराच्या लढाईत सक्रिय राहतील असा विश्वास व्यक्त केले.
व्यासपीठावर ॲड.एम.एच.शेख, सलीम मुल्ला, ॲड.अनिल वासम, बजरंग गायकवाड, वीरेंद्र पद्मा, युसुफ शेख, संजय ओंकार आदींची उपस्थिती होती. यावेळी सिटू चे राज्य महासचिव ॲड एम एच शेख यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी संस्थेचे लेखापाल गजेंद्र दंडी यांनी वार्षिक जमा – खर्चाचे ताळेबंद पत्र सादर करून उपस्थित सभासदांच्या उपस्थितीत एकमताने मंजूरी घेतली. तदपूर्वी सलीम मुल्ला यांनी श्रद्धांजली चा ठराव मांडून आदरांजली वाहिले. या वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲड अनिल वासम यांनी केले.