जिल्हा प्रशासनाची मान्यता, जिल्ह्यातील नऊ वाळू साठ्यांना प्रदूषण मंडळाची परवानगी

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील १२ वाळू साठ्यांच्या लिलाव प्रकियेस गती आली असून ९ वाळू साठ्यांना प्रदूषण मंडळाची परवानगी मिळाली आहे. पंढरपूर आणि मंगळवेढा येथील ३ वाळू साठ्यांची लिलाव प्रक्रिया लवकरच सुरू होईल, असे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातील भीमा व सीना नदीच्या पात्रात वाळू दिवसेंदिवस महाग होत असल्याने सर्वसामान्यांना घर बांधणे अवघड होत आहे. यातच नियमबाह्य उत्खनन करून वाळू माफिया तयार होत आहेत. ते ठरवतात त्याच दरात वाळू खरेदी करावी लागत आहे. ही समस्या सोडविण्यसाठी महसूल विभाग प्रत्येक वर्षी लिलाव प्रक्रिया राबवित असते. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ व दक्षिण सोलापूरमधील भीमा आणि सीना नदीकाठच्या वाळूसाठा लिलाव प्रक्रिया जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने पंढरपूरमधील बठाण येथील वाळू साठ्यास मान्यता दिली आहे. उचेठाण आणि तारापूर येथील लिलाव प्रक्रिया तांत्रिक अडचणीमुळे संथगतीने सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने १२ वाळू साठ्याचा जिलाव प्रक्रियेसाठी परवानगी मागितली होती. त्यापैकी ९ वाळू साठ्यास प्रदूषण मंडळाने परवानगी दिली आहे.