राज्य बालनाट्य स्पर्धेत सिंहगडच्या ‘बीज अंकुरले’ ने पटकाविला प्रथम क्रमांक

सोलापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित 21 वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा 2024 – 25 हुतात्मा स्मृती मंदिरात उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत केगाव येथील सिंहगड पब्लिक स्कूलच्या बालनाट्यने प्रथम पारितोषिक पटकाविले आहे. यात सांघिक, वैयक्तिक प्रकारात असे एकूण 1 लाख 6 हजारांचे बक्षीस घोषित झाले आहे.
राज्य बालनाट्य स्पर्धेचा सोलापूर केंद्राचा निकाल मंगळवारी (दि. 14) सायंकाळी 6 वाजता सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी घोषित केला. दि. 06 जानेवारी ते 10 जानेवारी या कालावधीत सोलापूर केंद्रावर एकूण 37 संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. यापैकी 31 नाटकांचे सादरीकरण झाले. अंदाजे सुमारे 350 बालकलावंतांनी यात सहभाग घेतल्याचे स्पर्धेचे समन्वयक अमोल धाबळे यांनी सांगितले.
यामध्ये सिंहगड पब्लिक स्कुल अँड ज्यूनिअर कॉलेज, केगाव, सोलापूर च्या संदीप जाधव दिग्दर्शित आणि डॉ. सतीश साळुंके लिखित ‘बीज अंकुरले’ या बालनाट्याला प्रथम पारितोषिक घोषित झाले आहे. सिंहगड पब्लिक स्कूलचे हे सहभागी होण्याचे पहिलेच वर्ष असूनही स्कुलने जवळपास सर्व प्रथम क्रमांकाची पारितोषिके पटकावली.
या कार्यक्रमास विद्यार्थ्यांसोबत पालकांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. नाट्यकलेच्या माध्यमातून बाल कलाकारांनी समाजाभिमुख संदेश देत प्रेक्षकांची मने जिंकली. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अंजली धारु, सुनील जगताप आणि अनिल कुलकर्णी यांनी काम पाहिले. यावेळी पालकांचा उस्फूर्त प्रतिसाद होता.
सोलापूर केंद्रावर प्राप्त झालेल्या या पारितोषिकांमुळे सर्व स्तरातून या बालकलावंतांचे आणि सहभागी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कौतुक आणि अभिनंदन होत आहे. नाट्यक्षेत्रातील प्रदीर्घ आणि सुजाण अनुभवामुळे तसेच संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले, प्राचार्या निखहत शेख आणि उपप्राचार्य प्रकाश नवले, बाल कलावंत आणि त्यांचे पालक यांच्या खंबीर पाठिंब्यामुळेच हे यश संपादित करू शकलो, असं मत यावेळी कला शिक्षक संदीप जाधव यांनी व्यक्त केले.
प्राचार्या निखहत शेख, उपप्राचार्य प्रकाश नवले यांचे अशा उपक्रमासाठी सातत्याने योगदान असते. सर्व यशस्वी बालकलावंत आणि प्रशिक्षक संदीप जाधव आणि सहयोगी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांनी अभिनंदन करत पुढील स्पर्धेस शुभेच्छा दिल्या. पालकांनी आपल्या पाल्यांना सातत्याने असेच पाठबळ देत राहावे, असे आवाहन प्राचार्या निखहत शेख आणि उपप्राचार्य, प्रकाश नवले यांनी केले. लेखक डॉ. सतीश साळुंके यांचे आभार व्यक्त केले.
∆ सहा पारितोषिकांवर सिंहगडची मोहर
या राज्य बालनाट्य स्पर्धेत सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्यूनिअर कॉलेजने सहाही प्रकारात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. यात सांघिक, वैयक्तिक प्रकारात असे एकूण 1 लाख 6 हजारांचे बक्षीस घोषित झाले आहे.
सांघिक प्रथम : बीज अंकुरले
दिग्दर्शन प्रथम : संदीप भास्कर जाधव
प्रकाश योजना प्रथम : प्रशांत जाधव
नेपथ्य प्रथम : संदीप भास्कर जाधव
रंगभूषा प्रथम : नीता चिवरीकर
अभिनय रौप्य : सोहम आरेनवरु