‘सबका साथ सबका विकास’ ची भूमिका भाजपाचीच, हैदराबादमध्ये विकास न करणारे सोलापुरात काय करणार.? : माधवी लता

सोलापूर : प्रतिनिधी
समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन समाजाचा विकास करण्यासाठी सर्वात सक्षम पर्याय भारतीय जनता पार्टीच आहे. ‘सबका साथ सबका विकास’ ची भूमिका भाजपाच मांडते, असे प्रतिपादन हैद्राबाद येथील भाजपा नेत्या माधवी लता यांनी केले.
शहर मध्य मतदारसंघाचे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय (ए) महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ सोमवारी प्रभाग क्रमांक १३ मध्ये पदयात्रा काढण्यात आली. या या पदयात्रेत सहभाग नोंदवून माधवी लता यांनी नागरिकांशी संवाद साधत भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांना मतदान करण्याचे आवाहन केले. पदयात्रेच्या मार्गावर माधवी लता यांनी सजविलेल्या उघड्या जीपमध्ये उभा राहून सोलापूरकरांना अभिवादन केले. तसेच काही अंतर चालत नागरिकांशी संवाद साधला.
माधवी लता म्हणाल्या, शहर मध्य मतदारसंघाचे मतदार भारताच्या उज्वल भविष्याचे भागीदार असणार आहेत. अनेक दशकांपूर्वी तेलुगु पद्मशाली समाज सोलापुरात आला. त्यांचे सोलापूरच्या विकासातील योगदान पाहून भाजपाने या समाजाचा सन्मान करत शहर मध्य मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. सोलापूरकरांनी गरीब मुस्लिमांच्या जागा बळकावणाऱ्यांच्या, दलित मुस्लिमांच्या विकासाच्या स्वप्नांना पायदळी तुडविणाऱ्या हैदराबादच्या नेत्यांच्या भूलथापांना बळी पडू नये. जे हैदराबादमधील मुस्लिमांना गरिबीपासून मुक्त करू शकले नाहीत, गरीब मुस्लिमांना नोकरी, शिक्षण देऊ शकले नाहीत, मुस्लिम स्त्रियांना ट्रिपल तलाकपासून मुक्ती देऊ शकले नाहीत, ते सोलापुरात येऊन काय विकास करणार ?
एमआयएम पक्षाचे ३० नगरसेवक आणि ५ हजार कार्यकर्ते महाराष्ट्रातील पाच मतदारसंघात आले आहेत. त्यांच्या माध्यमातून विविध मतदारसंघात काम करण्यात येत आहे. त्यांच्याकडून बोगस मतदानासारखी अनेक बेकायदेशीर कामे होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी याप्रसंगी केली.
श्री पंचमुखी हनुमान देवस्थानपासून सुरुवात झालेली ही पदयात्रा चिप्पा भाजी मंडई, साईबाबा चौक, ७० फूट रस्ता, श्री स्वामी समर्थ मंदिर, भावनाऋषी दवाखाना, लक्ष्मी नरसिंह मंदिर, कुंचीकोरवे नगर, संत तुकाराम चौक, कैकाडी गल्ली, मुदगल बगीचा, पाथरूट चौकमार्गे खड्डा तालीम येथील श्री हनुमान मंदिराजवळ विसर्जित झाली.
या पदयात्रेत भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा शहर अध्यक्षा विजया वड्डेपल्ली, सुनीता कामाठी, नगरसेविका प्रतिभा मुदगल, श्रीनिवास रिकमल्ले, ओबीसी मोर्चा शहर उपाध्यक्ष महेश अलकुंटे, रुपाली अलकुंटे, यादगिरी बोम्मा, सदानंद गुंडेटी, सत्यनारायण गुर्रम, अंजली वलसा, सुनील म्हेत्रे, अशोक दुस्सा, विजय चिप्पा, संतोष हुंडेकरी, माजी नगरसेविका सरिता वडनाल, मेरगु तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.