शहर मध्य मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचारार्थ सेटलमेंट फ्री कॉलनी येथे कॉर्नर सभेला तुफान गर्दी

सोलापूर : प्रतिनिधी
मोदी सरकारने सर्व सामान्यांचे जगणे मुश्किल केले असा आरोप करत काँग्रेस पक्षाला त्यागाचा, समर्पणाचा इतिहास आहे. गोरगरीब, भटके विमुक्त, सर्वसामान्य जनतेचा आवाज काँग्रेस आहे. भटक्या विमुक्तांच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसला खंबीरपणे साथ द्या. काँग्रेस सत्तेत आल्यास महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करेल , असे आश्वासन काँग्रेसच्या खा. प्रणिती शिंदे यांनी येथे दिले.
सोलापूर शहर मध्य मतदार संघातील महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचारार्थ सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर एक जुना वांगी रोड येथे सायंकाळी आयोजित कॉर्नर सभेत त्या बोलत होत्या. यावेळी काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे, काँग्रेस भटक्या विमुक्त जाती जमाती विभागाचे शहर अध्यक्ष युवराज जाधव, नारायण जाधव, माजी नगरसेविका अश्विनी जाधव , चंद्रकांत जाधव, अंबादास जाधव, देविदास गायकवाड, चंद्रकांत जाधव, बप्पा जाधव, ज्ञानेश्वर जाधव, पारुबाई काळे अजून सहा मान्यवरांचे प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी खा. प्रणिती शिंदे यांनी मोदी सरकारच्या कारभारावर हल्लाबोल केला. त्यापुढे म्हणाल्या, भाजपाचे मोदी सरकार आल्यापासून लोकांना मिळणारे धान्य बंद झाले आता संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत नाही आवदसा आल्यासारखे झाले आहे. पाणी बंद, महागाई वाढली. सिलेंडरचे दर वाढवले आणि त्यामुळेच सर्वांचे जगणे मुश्किल केले. सर्वांचे जगणे सुजलाम सुफलाम होण्यासाठी काँग्रेस सत्तेत येणे गरजेचे आहे.
ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी भटक्या विमुक्तांसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली होती. काँग्रेस सत्तेत आल्यास प्रत्येक कुटुंबाला 25 लाखांपर्यंतचा आरोग्य विमा आणि मोफत औषधे मिळणार आहे. महिलांना दरमहा 3 हजार रुपये मिळणार आणि मोफत बस प्रवास करण्यात येणार आहे. बेरोजगार तरुणांना दरमहा 4 हजार रुपयांची मदत करण्यात येईल. कर्नाटक, तेलंगणातही हे करून दाखवले आता महाराष्ट्रात करण्यात येईल, असेही आश्वासन यावेळी खा. प्रणिती शिंदे यांनी केले.
यावेळी परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेसचे चेतन नरोटे यांना विजयी करण्याचा निर्धार यावेळी मतदारांनी केला.
त्या बॉम्बस्फोटाची आठवण करून देताच उपस्थितांचे डोळे पाणवले !
खासदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या भाषणात बॉम्बस्फोटामध्ये राजीव गांधी यांच्या निधनाची घटना सांगितली. यावेळी उपस्थितांचे डोळे पाणवले. दरम्यान त्या नंतरही सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्ष एकत्र ठेवला. सर्वांसाठी देशही एकत्र ठेवला. काँग्रेस पक्षाने पन्नास टक्के महिलांना आरक्षण दिले. त्यामुळे अनेक महिला नगरसेविका झाल्या. अन्नसुरक्षा योजना सोनिया गांधी यांच्यामुळे मिळाली, असेही खा. प्रणिती शिंदे म्हणाल्या.