बाबा आढाव यांच्या ‘आत्मक्लेश आंदोलनास’ पाठींबा, सोलापूरात ‘ईव्हीएम विरोधी कृती समिती’ ने केली निदर्शने

सोलापूर : प्रतिनिधी
थोर समाजसेवक बाबा आढाव यांनी पुणे येथील फुले वाडा मध्ये सुरू केलेल्या आंदोलनास सक्रिय पाठींबा सोलापुरात देण्यात आला. संविधानावर आधारित राष्ट्रवाद आणि लोकशाही वाचविण्या साठी सुरू केलेल्या आत्मक्लेश आंदोलनास सक्रिय पाठींबा दर्शविण्यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर युथ असोसियशन संस्थापक उत्तम नवघरे, विद्याताई माने, शेखर बंगाळे, किरण पारवे, रामचंद्र जगताप यांनी पुढाकार घेऊन सोलापूरात ‘ईव्हीएम विरोधी कृती समिती’ गठीत करण्यात आल्याची घोषणा केली.
सदर प्रसंगी हसिब नदाफ, जगदीश कलकेरी, विवेक कंदकुरे, शफीक काझी, काॅ.रविंद्र मोकाशी, मुश्ताक इनामदार, समिउल्लाह शेख, नाना प्रक्षाळे, प्रशिक नवघरे, सादीक नदाफ, अ.सत्तार, अ.करीम, मो.शिराज, बाशा नदाफ आदींनी आपल्या संबोधनात आकडेवारीसह उपलब्ध पुरावे, वर्तमानपत्रातील बातम्या व लोकांनी स्वयंस्फूर्तीने सोशल मिडियावर व्हायरल केलेली वास्तव परिस्थिती या सर्व गोष्टींची दखल घेऊन निवडणूक आयुक्तांनी निष्पक्ष चौकशी केली पाहिजे व पार पडलेली महाराष्ट्र विधान सभेच्या निवडणुकीचा दोषपुर्ण निकाल रद्दबातल ठरवून फेरनिवडणूका घ्याव्यात अशी मागणी लावून धरली.
ईव्हीएम हटाव, देश बचाओ, बाबा आढाव, हम तुम्हारे साथ है, संविधानिक राष्ट्रवाद- लाँग लिव्ह, अशा घोषणांनी आंदोलकांनी सारा परिसर दणाणून सोडला. हे आंदोलन यशस्वी होईपावेतो स्वस्थ राहायचे नाही असा निर्धार करून लोकशाहीवादी सर्व पक्ष, संघटना, संस्था यांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून येत्या १ डिसेंबर २४ रोजी सायंकाळी पाच वाजता शासकीय विश्रामगृहात व्यापक बैठक बोलावण्यात आली आहे.