आरोग्यमहाराष्ट्रशिक्षणशेतीसामाजिकसोलापूर

सिद्धेश्वर कृषी व औद्योगिक प्रदर्शनाचे उद्घाटन, शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीवर भर द्यावा : अशोक किरनळ्ळी

सोलापूर : प्रतिनिधी

हरित क्रांतीनंतर रासायनिक खते व कीटक, बुरशीनाशकांचा बेसुमार वापर केल्याने कॅन्सरचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च कमी करून नैसर्गिक शेतीवर भर द्यावा असे आवाहन ‘आत्मा’चे संचालक अशोक किरनळ्ळी यांनी केले.

श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या वतीने होम मैदानावर भरवण्यात आलेल्या सिद्धेश्वर कृषी व औद्योगिक प्रदर्शनाचे उद्घाटन किरनळ्ळी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी हे होते. यावेळी व्यासपीठावर श्री सिद्धेश्वर यात्रा समितीचे प्रमुख महादेव चाकोते, सिद्धेश्वर देवस्थानचे उपाध्यक्ष सिद्धेश्वर बमणी ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, जि. प. चे कृषी विकास अधिकारी हरिदास हवळे, उपविभागीय कृषी अधिकारी नंदकुमार पाचककुडवे उपस्थित होते. प्रास्ताविकात सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे प्रमुख गुरुराज माळगे यांनी प्रदर्शनात सहभागी झालेल्या विविध घटकांबद्दल सविस्तर माहिती दिली.

किरनळ्ळी म्हणाले, राज्यात 80 टक्क्याहून अधिक शेतकरी अल्प व अत्यल्प भूधारक आहेत. या शेतकऱ्यांना पाणी, वीज, मजूर व उत्पादित मालाला योग्य बाजारभाव मिळण्याच्या समस्या आहेत. या शेतकऱ्यांच्या आर्थिक स्तर उंचावण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने अनेक योजना आखल्या गेल्या आहेत. ‘आत्मा’च्या माध्यमातून वीस ते पंचवीस शेतकऱ्यांचा गट स्थापन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमीत कमी कसे करता येईल याचा शासनस्तरावर प्रयत्न आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या कृषी अवजारांवर 60 ते 80 टक्के अनुदान आहे. ड्रोन सारखे नवनवीन तंत्रज्ञान येत आहेत. हरित क्रांतीनंतर रासायनिक खतांचा अधिक वापर केल्याने पंजाब सारखे राज्यात कॅन्सरचे रुग्ण वाढले. राज्य शासनाने नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने डॉ पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती योजना आणली आहे. उपलब्ध संसाधनातून शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब करून उत्पादन वाढवण्यावर भर द्यावा असे आवाहन करून राज्यात 25 लाख शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यास प्रवृत्त करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी काडादी म्हणाले, गेल्या 54 वर्षापासून सिद्धेश्वर यात्रेनिमित्त कृषी प्रदर्शन भरवण्यात येते. गेल्या तीन-चार वर्षांपासून त्याचे स्वरूप बदलून मोठ्या प्रमाणात हे प्रदर्शन भरवण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यासह आजूबाजूच्या शेतकऱ्यांपर्यंत कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान पोहोचावे यासाठी आणखीन भव्य प्रमाणात हे प्रदर्शन भरवण्याचा संकल्प आहे. शहरी भागातील गृहिणींसाठी किचन गार्डन, व्हर्टिकल फार्मिंगची ओळख व्हावी याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रदर्शनासाठी शासनाच्या कृषी विभागाचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे विश्वस्त गिरीश गोरनळ्ळी, काशिनाथ दर्गोपाटील, विश्वनाथ लब्बा, बाळासाहेब भोगडे, डॉ राजेंद्र घुली, मल्लिकार्जुन कळके, प्रभूराज मैंदर्गीकर, सुरेश म्हेत्रे, रतन रिक्के यांच्यासह सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते, तम्मा मसरे, संचालक शिवानंद पाटील, राजशेखर पाटील , कृषी विज्ञान केंद्राचे लालासाहेब तांबडे, आत्माचे राजेंद्र चौधरी आदी उपस्थित होते. श्री सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त पशुपतिनाथ माशा ळ यांनी सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!