लहान मुलांच्या साक्षीची परखड चिकित्सा आवश्यक सोलापूर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

सोलापूर : प्रतिनिधी
लहान मुलांना सहजपणे पढवता येऊ शकते त्यामुळे फौजदारी खटल्यात लहान मुलांच्या साक्षीवर विश्वास ठेवण्याच्या अगोदर त्यांच्या साक्षीची परखड तपासणी चिकित्सा आवश्यक असते असे मत व्यक्त करून दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी नवरा, सासू व दोन दीर यांची अति. सत्र न्यायाधीश संगीता शिंदे यांनी निर्दोष मुक्तता केली.
चरित्राच्या संशयावरून सदर विवाहितेचा नवरा, सासू व दोन दीर यांनी छळ केला आणि सदर विवाहितेला त्या चौघांनी ३० मार्च २०१९ रोजी सकाळी ११ वाजता मारहाण केली त्यामुळे त्या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. या आरोपावरून वरील चौघांविरुद्ध खटला दाखल करण्यात आलेला होता. या खटल्याच्या सुनावणी दरम्यान तिच्या मुलाने वडील, आजी व दोन काका यांनी सकाळी ११ वाजता आपल्या आईला मारहाण केली अशी साक्ष दिलेली होती. सदर खटल्याच्या सुनावणी दरम्यान आरोपीचे वकील ॲड. धनंजय माने यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, सदर लहान मुलगा आई वारल्यापासून त्याच्या फिर्यादी असलेल्या मामाकडेच राहत आहे घटने दिवशी तो शाळेत गेला होता व सदरची शाळा १२ वाजता सुटली असे उलट तपासणीत त्याने कबूल केले आहे, त्यामुळे ११ वाजता तो घरी नव्हता हे सिद्ध होते, मामाच्या शिकवणी वरून आपण जबाब दिलेला आहे असे त्याने उलट तपासात कबूल केलेले आहे. विलंबाने त्याचा घेतलेला जबाब आणि विलंबाने दिलेली फिर्याद यावर विश्वास ठेवता येणार नाही.
सदर विवाहितेच्या प्रेमप्रकरणाबद्दल तिच्या नवऱ्याने फोन करून तिच्या वडिलांना कळवले होते आणि त्यामुळे तिला माहेरी पाठवण्यात आले होते, त्यानंतर तिने माफी मागितली व पुन्हा नांदण्यास आली होती. विवाहित असून सुद्धा केलेल्या प्रेम प्रकरणामुळे तिला आलेल्या अपराधीपणाच्या भावनेमुळे तिने आत्महत्या केलेली असावी, असा युक्तिवाद केला.
या खटल्यात आरोपींतर्फे ॲड. धनंजय माने, ॲड. जयदीप माने, ॲड. विकास मोटे, ॲड. प्रणित जाधव, ॲड. श्रीहरी कुरापाटी, ॲड. वीरभद्र दासी, ॲड. कुमार उघडे यांनी काम पाहिले.