उत्तर कसबा येथील पुरुषोत्तम उर्फ आप्पा बन्ने यांच्या खून प्रकरणी आरोपीचा जामीन फेटाळला

सोलापूर : प्रतिनिधी
उत्तर कसबा येथील पुरुषोत्तम उर्फ आप्पा दिगंबर बन्ने (वय ४८, रा. उत्तर कसबा) यांचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीची जामीन अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. आझमी यांनी फेटाळला.
विजयकुमार ऊर्फ बाळू शांतप्पा आडके (वय ३२, रा. देगाव, ता. उत्तर सोलापूर) असे जामीन फेटाळलेल्या आरोपीचे नाव आहे. २१ जून २०२४ रोजी बाळे (ता. उत्तर सोलापूर) येथील शेतामध्ये शासकीय मोजणी करत असताना आरोपी शांतप्पा आडके, सागर आडके, बाळू आडके यांनी पूर्वीचा राग मनात धरुन ही शेती आमची आहे, मोजणी करायची नाही. नाही तर एकेकाला सोडणार नाही, यांना संपवू असे म्हणून सात ते आठ आरोपींनी एकत्र येऊन कोयता, पाईपने पुरुषोत्तम उर्फ आप्पा बन्ने यांच्यावर हल्ला करून त्यांचा खून केला होता. याप्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
आरोपीवर नोंदवलेला गुन्हा त्याला पूर्णपणे लागू आहे, तपास पूर्ण झाला आहे, अशा परिस्थितीत अर्जदाराची जामिनावर सुटका झाली तर तो दूर पळून फरार होईल. आरोपी हे अट्टल गुन्हेगार असल्याने ते फिर्यादी, साक्षीदारांवर दबाव आणतील, खटल्याच्या वेळी ते न्यायालयात हजर राहणार नाही, आरोपीवर यापूर्वी एक व त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.
अशा प्रकारचे गुन्हे आरोपीकडून पुन्हा- पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कारणास्तव आरोपीचा जामीन अर्ज फेटाळण्याची विनंती सरकार पक्षाने न्यायालयास केली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आझमी यांनी विजयकुमार ऊर्फ बाळू आडके याचा जामीन अर्ज फेटाळला. यात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांनी तर आरोपीतर्फे अॅड. संतोष न्हावकर यांनी काम पाहिले.