सरपंच हत्या प्रकरण, त्या’ नेत्याला मंत्रिपद देऊ नका, संभाजीराजे छत्रपती यांचे अजित पवार यांना आवाहन

सोलापूर : प्रतिनिधी (बीड)
सरंपच संतोष देशमुख यांनी सर्व समाजासाठी काम केले. अन्यायाविरोधात लढल्याने त्यांचा खून झाला. या प्रकरणाला जातीय रंग नको. तपासासाठी ‘एसआयटी’ नेमावी. जिल्ह्यातील आमदारांनी अधिवेशनात हा मुद्दा लावून धरावा. या प्रकरणाचा तपास होईपर्यंत संबंधित नेत्याला अजित पवारांनी मंत्रिपद देऊ नये, अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आला. या प्रकरणात सात संशयित आरोपींवर गुन्हा नोंद असून त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटेचाही समावेश आहे. दरम्यान, संभाजीराजे छत्रपती व पँथर सेनेचे दीपक केदार यांनी आज मस्साजोगला भेट देऊन देशमुख कुटुंबीयांचे सांत्वन केले.
यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी केजच्या पोलिस निरीक्षकांना सहआरोपी करण्याची मागणीही केली. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनीही लक्ष घालावे, अथवा उद्रेक झाला तर आपण जबाबदार नाही, असा इशाराही त्यांनी दिला संतोष देशमुख यांचे अपहरण व खून प्रकरणी केज पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत महाजन यांना शनिवारी सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले.
गुन्हा उशिरा नोंदविणे, संशयित आरोपींवर यापूर्वी गुन्हा नोंद न करून घेणे आदी विविध आरोप त्यांच्यावर ग्रामस्थांनी केले होते.