मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून तात्काळ काढा, वाल्मिक कराड यास अटक करा, मराठा क्रांती मोर्चाची मागणी

सोलापूर : प्रतिनिधी
बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि मुख्य आरोपीला तात्काळ अटक करावी. या घटने मागील मास्टर माईंडचा शोध घेऊन त्याच्यावरही कारवाई करावी. या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा सोलापूरच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले की, बीड जिल्ह्यात दहशत माजविणारा व्हाईट कॉलर गुंड वात्मिक कराड, सुदर्शन घुले व विष्णु चाटे व अन्य साथीदार यांची संघटित गुन्हेगारी टोळी असून याचा प्रमुख वाल्मिक कराड आहे. वाल्मिकी कराड व टोळीविरुध्द बीड जिल्ह्यात खून, खुनाचा प्रयत्न करणे, स्वतःच्या फायद्यासाठी लोकाचे अपहरण करून खंडण्या उकळणे यासारखे गंभीर स्वरूपाचे ३२ गुन्हे दाखल आहेत. वाल्मिक कराडच्या प्रचंड दहशतीमुळे त्यांचेविरुध्द तक्रार देण्यास कोणी धजावित नाहीत.
पवनचक्की कंपनीकडून करोडोची खंडणी घेण्याचा वाल्मिक कराडचा प्रयत्न मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख व ग्रामस्थांच्या विरोधामुळे निष्फळ झाला. त्यावेळी कंपनीच्या सुरक्षा रक्षकांस वाल्मिकी कराडच्या गुंडांनी मारहाण करून त्यास खल्लास करण्याचा प्रयत्न केला. याबाबत पोलिसांत तक्रार देवूनसुध्दा पोलीसांनी सराईत गुन्हेगार वाल्मिक कराडच्या दहशतीला व राजकीय दबावाला बळी पडून पोलिसांनी तक्रारीची गांभिर्याने दखल घेतली नाही. त्यामुळेच वाल्मिकी कराड याच्या सांगणेवरून संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली.
ग्रामस्थांनी व संतोष देशमुखांनी बीडचा तथाकथित बॉस धनंजय मुंडेचा खास वाल्मिक कराडच्या गुंडांना धक्काबुक्की केल्याचा विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. वाल्मिक कराडच्या गुंडांना धक्काबुक्की झाली अन वाल्मिक अण्णाने काहीच केले नाही, असा चुकीचा संदेश बीड जिल्ह्यात जावून कराडची दहशत कमी व्हायला नको, म्हणून वाल्मिक कराडने प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरले व टोळीतील ज्यांना धक्काबुक्की झालेली होती, त्या गुंडाना उचकावून धक्काबुक्की घटनेचा बदला घेण्याच्या दृष्टहेतूने व कटकारस्थानाने संतोष देशमुखची हत्या करण्यास टोळीतील सुदर्शन घुले, विष्णु चाटे यांसह अन्य गुंडांना वाल्मिकी कराड याने प्रवृत्त केले. वाल्मिक कराडच्या गुंडांनी लोकांच्या मनात दहशत बसविण्यासाठी थंड डोक्याने कट रचून, संतोष देशमुखची हत्या करण्याच्या हेतूने टोल नाक्यावर गाडी अडवून संतोष देशमुखचे दिवसाढवळ्या अपहरण करून निघुण हत्या केली.
यामागचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड असल्यामुळे देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराड यांस मुख्य आरोपी करावे. सदर हत्येमुळे वाल्मिक कराड व टोळीची दहशत महाराष्ट्रभर गेली. म्हणून वाल्मिक कराडच्या गुन्हेगारी कृत्यांना पायबंध घालणे गरजेचे आहे. त्यामुळे वाल्मिक कराडवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्याचे आदेश द्यावेत. यासह बीड येथे दोन दिवसानंतर होणाऱ्या भव्य मोर्चा समाज बांधवांनी उपस्थित राहावे आणि मंत्री धनंजय मुंडे यांना तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक दिलीप कोल्हे आणि दास शेळके यांनी केली.
निवेदन देते वेळी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक सुनील रसाळे, अमोल शिंदे, श्रीकांत घाडगे, प्रताप चव्हाण, अनंत जाधव, संजय शिंदे, शशी थोरात, योगेश पवार, शेखर फंड, महेश देवकर, गणेश शिंदे, संजय घाडगे, यांच्यासह सदस्य उपस्थित होते.