
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी आज चुरशीने 57.46 टक्के मतदान झाले आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपचे आमदार राम सातपुते यांच्यात जोरदार लढाई झाल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी चुरशीने मतदान झाले. किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळता सोलापूर लोकसभा मतदारसंघात शांततेत मतदान झाले.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांच्या मोहोळ विधानसभा मतदारसंघात झाले असून ते 60.16 टक्के झाले आहे, त्यापाठोपाठ भाजप आमदार समाधान आवताडे यांच्या पंढरपूर-मंगळेवढा विधानसभा मतदारसंघात 58.09% मतदान झाले आहे.
सोलापूर शहर उत्तर मतदार संघात 56.81 टक्के, तर सोलापूर शहर मध्य मतदारसंघात 56.32% एवढे मतदान झाले आहे. हा मतदारसंघ हा आमदार प्रणिती शिंदे यांचा आहे. सोलापूर शहर उत्तर मतदार संघ हा माजी पालकमंत्री तथा भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचा आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा सचिन कल्याणशेट्टी यांच्या अक्कलकोट मतदार संघात 55.31% मतदान झाले आहे, तर माजी मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांच्या दक्षिण सोलापूर या मतदारसंघात 58.21% एवढे मतदान झाले आहे.
उन्हाचा संभाव्य तडाका लक्षात घेता सकाळ पासूनच मतदान केंद्रावर गर्दी झाली होती. दुपारच्या उन्हामुळे ही गर्दी काहीशी मंदावली होती. मात्र, दुपारी चारनंतर मतदान केंद्रावर मतदारांच्या पुन्हा रांगा लागल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत लागलेल्या रांगामुळेच मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसून येत आहे. कारण, सायंकाळी पाचपर्यंत सोलापूर मतदारसंघात 49.85% एवढे मतदान झाले होते, सायंकाळी पाचनंतर सहापर्यंत म्हणजे एक तासाच्या मतदानात तब्बल साडेसात टक्के मतदान झाल्याचे दिसून येत आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात आज सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 57.46% इतकं मतदान झालं आहे. सोलापूर लोकसभा मध्ये एकूण 20 लाख 30 हजार 119 मतदार आहेत. त्यातील 6 लाख 25 हजार 699 पुरुष, 5 लाख 40 हजार 857 महिला आणि इतर 44 अशा एकूण 11 लाख 66 हजार 600 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
मोहोळ 60.16 % म्हणजेच
1 लाख 92 हजार 392 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
उ सोलापूर 56.81 % म्हणजेच
1 लाख 76 हजार 772 इतकं मतदान झालं.
मध्य सोलापूर 56.32 % म्हणजेच
1 लाख 83 हजार 418 जणांनी मतदान केलं.
अक्कलकोट 55.31% म्हणजेच
1 लाख 98 हजार 903 जणांनी मतदान केलं.
द. सोलापूर 58.21%
म्हणजेच 2 लाख 7 हजार 255 जणांनी मतदान केलं.
पंढरपूर 58.09 %
2 लाख 7 हजार 860 जणांनी मतदान केलं.
अशी शासकीय आकडेवारी उपलब्ध झाली आहे.