आंबेडकर उद्यानातील कामाच्या चौकशीची बसपाकडून मागणी, ७ फेब्रुवारीला आंदोलन

सोलापूर : प्रतिनिधी
न्यू बुधवार पेठे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील कामांची तांत्रिक तपासणी करण्यात यावी. उद्यानात माता रमाई यांचा पुतळा मूळ स्वरूपात बसविण्यात यावा, अशी मागणी बहुजन समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी केली.
बसपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. संजीव सदाफुले, आप्पासाहेब लोकरे, देवा उघडे यांनी मनपा आयुक्त शीतल तेली उगले यांना निवेदन दिले. एक वर्षापूर्वी आंबेडकर उद्यानात एक कोटी २० लाख रुपये खर्चुन सुशोभीकरणाची कामे सुरू झाली. आता अचानक काम बंद आहे. उद्यानात. बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या बाजूला माता रमाई यांचा पुतळा बसविण्यात येणार आहे. या पुतळ्याच्या चबुतऱ्याचे बिल ८० ते ९० लाख रुपये दाखविले आहे.
या कामाची तांत्रिक तपासणी करावी. बोगस बिल अदा करू नये. पुतळा मूळ स्वरूपात आणि आंबेडकरप्रेमींना विश्वासात घेऊन बसविण्यात यावा. समाजातील कोणाचाही आक्षेप राहणार नाही, याची काळजी घ्यावी.
अन्यथा ७ फेब्रुवारी रोजी माता रमाई यांच्या जयंतीदिनी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या निवेदनातून दिला. यावेळी तिपण्णा लोहार, अमर साळवे, शिलवंत काळे, सुहास सुरवसे, युवराज बडेकर आदी उपस्थित होते.