‘शौचालय हटाव’ मोहिमेसाठी नारीशक्तीने केली महाआरती, विविध समाज घटकांच्या महिला प्रतिनिधींचा हुंकार, ‘जब तक तोडेंगे नाही, तब तक छोडेंगे नही’

सोलापूर : प्रतिनिधी
शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज मंदिरात विष्णू घाट परिसरातून प्रवेश करण्यासाठी एक प्रवेशद्वार आहे. ज्याच्या अगदी लागून एक शौचालय आहे. हे शौचालय कायमस्वरूपी येथून हटवावे या एकत्रित मागणीसाठी शनिवारी सायंकाळी श्री सिद्धेश्वर मंदिरात नारीशक्तीने महाआरती केली.
‘जब तक तोडेंगे नाही, तब तक छोडेंगे नही’, शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय आदी घोषणांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला. विविध समाजाच्या महिलांनी एकत्र येत केलेली ही पहिलीच महाआरती होती. प्रारंभी सिद्धरामांची आरती घेण्यात आली. त्यानंतर प्राथमिक स्वरूपात मोहिनी पत्की, रंजिता चाकोते, चंद्रिका चव्हाण, वैशाली गुंड, सिंधुताई काडादी, यांनी आपल्या भावना मनोगतातून मांडल्या. मुख्य प्रवेशद्वाराजवळ शौचालय असणे हे मुळात चुकीचे आहे. तसेच अनेक मार्गांनी या तलावात सांडपाणी येते, ज्यामुळे तलावाचे पावित्र्य धोक्यात आले आहे. महापालिका प्रशासनाने ताबडतोब हे शौचालय पाडावे, दुसरीकडे स्थलांतर करावे. मंदिर आणि तलाव परिसर कायम स्वच्छ ठेवावा. सिद्धरामेश्वर हे सोलापूरची अस्मिता आहेत. असा सूर या महिला प्रतिनिधी यांचा होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अमृता नकाते यांनी केले. अश्विनी लिगाडे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
यांची अशी सेवा…
उद्योजक दत्ताअण्णा सुरवसे यांनी ४० किलो बुंदी लाडू प्रसाद म्हणून दिले. तर कसबा गणपती प्रतिष्ठानने १०० स्टीलच्या आरती उपक्रमासाठी दिल्या.
संस्थेतर्फे सिद्धरामेश्वर यांच्या महाआरतीसाठी १०० श्री फळांची सेवा देणे हे फार मोठे काम नाही. पण शौचालय हटाव ही मागणी मोठी आहे. त्यात नारीशक्ती पुढे येत असल्याने आम्ही आमची सेवा दिली.
-आनंद तालीकोटी, आस्था सामाजिक संस्था
सोलापूरची अस्मिता असणाऱ्या शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यांच्या चरणी आम्ही संस्थेतर्फे १०० श्रीफळ, तीन किलो कापूर अशी सेवा रुजू केली आहे. अशा धार्मिक कार्यासाठी आम्ही कायम अग्रणी असू.
-समृद्धी गुंड, अध्यक्ष, कृष्णाली फाऊंडेशन