सोलापूरमहाराष्ट्रशिक्षणसामाजिक

‘उद्योगवर्धिनी’ च्या स्त्री सक्षमीकरणाचा २१ वर्षांचा प्रवास उलगडणार नाट्यरूपात

तळागाळातील स्वयंपूर्ण बनलेल्या महिला सादर करणार नाट्याविष्कार, सोलापूरकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

सोलापूर : प्रतिनिधी

तब्बल २० हजार गरजू महिलांना स्वावलंबी बनविणाऱ्या उद्योगवर्धिनी संस्थेमुळे आजवर तळागाळातून स्वयंपूर्ण बनलेल्या महिला रंगमंच गाजवणार आहेत. उद्योगवर्धिनी संस्थेला २१ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शुक्रवारी (दि. २१) सायंकाळी सहा वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात ‘मी ते आम्ही’ – प्रवास उद्योगवर्धिनीचा’ हा नाट्यरूपातील कार्यक्रम सादर होणार आहे, अशी माहिती उद्योगवर्धिनी संस्थेच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार प्रमोद कुलकर्णी (पुणे) यांचे प्रमुख मार्गदर्शन होणार आहे.

‘मी ते आम्ही’ – प्रवास उद्योगवर्धिनीचा’ या नाट्याविष्कारात संस्थापिका चंद्रिका चौहान यांनी उद्योगवर्धिनी संस्थेची स्थापना केल्यापासून २१ वर्षांत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीतून महिलांना बाहेर काढत त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे विविध उपक्रम, त्यातून गरजू महिलांना लाभलेली स्वयंपूर्णता, अन्नपूर्णा क्षुधाशांती योजना, शिलाई प्रशिक्षण व उत्पादन, मंगलदृष्टी भवन, सेवा पाथेय प्रकल्प, विविध बचतगटांना मार्गदर्शन व प्रशिक्षण, शांतसंध्या, समुपदेशन केंद्र आदी सेवाभावी प्रकल्पांची माहिती नाट्याविष्काराच्या माध्यमातून सोलापूरकरांना पाहायला मिळणार आहे. उद्योगवर्धीनी संस्थेच्या १५० महिला सदस्या हे नाट्य सादरीकरण करणार असून अश्विनी तडवळकर यांनी याचे लेखन केले असून अभिनेते, दिग्दर्शक आमीर तडवळकर यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. सोलापूरकरांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन उद्योगवर्धीनी संस्थेच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान यांनी याप्रसंगी केले.

या पत्रकार परिषदेस उद्योगवर्धिनी संस्थेच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान, उपाध्यक्षा शोभा श्रीवास्तव, सचिवा मेधा राजोपाध्ये, खजिनदार वर्षा विभूते, संचालिका मृणालिनी भूमकर, ॲड. गीतांजली चौहान, सुलोचना भाकरे, स्मिता लाहोटी, कांचना श्रीराम, मीनाक्षी सलगर उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!