देवेंद्र फडणवीस यांचा मी टरबूज, फडतूस, कलंक असा उल्लेख करणार नाही कारण ते त्यांना झोंबत : उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांचा घेतला समाचार, सोलापुरातील सभेत प्रणिती शिंदे यांना मतदान करण्याचे केले आवाहन

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापुरात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित कर्णिक नगर येथे सभा घेण्यात आली. यावेळी व्यासपीठावर सोलापूर लोकसभा मतदारसंघांच्या उमेदवार प्रणिती शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यास महाविकास आघाडीतील मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. भाषणा दरम्यान उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा चांगलाच समाचार घेतला.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी टरबूज, फडतूस, कलंक असा उल्लेख करणार नाही कारण ते त्यांना झोंबत, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला. तसेच निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, फडणवीस यांनी कोरोना काळात नरेंद्र मोदी यांनी देशाला लस देऊन सर्वाचे प्राण वाचवले. त्याचे आभार म्हणून मोदींना मत द्या, असे आवाहन केले होते. त्या आवाहनाचा समाचार घेताना, जर मोदींनी लस दिली असेल तर संशोधक काय गवत उपटत होते का? अशी बोचरी टीका देखील त्यांनी केली. तसेच लस मोदी यांनी नाही तर महाराष्ट्रातील पुनावाला यांनी तयार केली आणि महाराष्ट्रात ती लस आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिली. याचा मला अभिमान असल्याची देखील ठाकरे म्हणाले.