पहलगाम हल्ल्याचा हिंदू महासभेच्या युवकांनी अनोख्या पद्धतीने नोंदवला निषेध
युवकांच्या हातातील फलक पाहण्यासाठी सोलापूरकरांची गर्दी..

सोलापूर : प्रतिनिधी
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सोलापुरातील हिंदू महासभेच्या युवकांनी एक अनोखी शक्कल लढवली. एक है तो सेफ है, हिंदूंनी प्रत्येक वस्तूची खरेदी हिंदू व्यापाऱ्याकडून करावी, ते धर्म विचारून गोळी मारू शकतात तुम्ही धर्म विचारून वस्तू खरेदी करू शकता, आर्थिक बहिष्कार घाला, असे म्हणत प्रत्येक वस्तू ही हिंदू व्यापाऱ्यांकडून खरेदी करावी अशी मागणी त्यांनी आपल्या अनोख्या आंदोलनातून केली.
हातामध्ये असे अनेक मजकूर लिहिलेले फलक घेऊन हिंदु महासभेचे युवक छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शनिवारी सायं 6 वाजता जमले. प्रारंभी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून या अनोख्या रॅलीची सुरुवात केली. हे फलक हातात घेऊन संपूर्ण नवी पेठ मार्गे सोन्या मारुती चौक बाळीवेस येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी हातातील फलक वाचण्यासाठी सोलापूर मधील नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले.
या रॅलीत हिंदू महासभेचे युवक लतेश हिरवे, विनायक बहिरवाडे, सुमित कैस्ठी, श्रीशांत स्वामी, राहुल कांबळे, योगेश कणके, पृथ्वी चौघुले, वेदांत गवळी, श्रवण वालीकर, अर्जुन उबाळे यांच्यासह युवक उपस्थित होते.