अवघे सोलापूर शहर भीममय, दिमाखदार मिरवणुकीने जयंतीची सांगता, ‘जय भीम’चा जयघोष अन् वाद्यांच्या तालावर तरुणाईचा ठेका
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती सप्ताहाची सोलापुरात विराट मिरवणुकीने सांगता

सोलापूर : प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती सप्ताहाची सांगता सोलापुरात विराट मिरवणुकीने करण्यात आली. भीम अनुयायांच्या अलोट गर्दीत आंबेडकरी विचारांचा जागर करत शानदार मिरवणुकीने डोळ्यांचे पारणे फिटले. यंदा प्रथमच सकाळी ११ वाजल्या पासूनच सर्व मंडळांनी आपल्या मिरवणुकीस सुरवात केल्याचे दिसून आले. मान्यवरांच्या हस्ते पूजा आणि उद्घाटन होऊन मिरवणुकांना प्रारंभ झाला. ‘बोलो रे बोलो जय भीम बोलो’, ‘ताकत से बोलो जय भीम बोलो’, ‘हिम्मत से बोलो जय भीम बोलो’ अशा गगनभेदी घोषणांनी शहर परिसर दणाणून गेले होते.
शहरातील आमराई, देगाव नका, विजापूर रोड, लष्कर आदी परिसरातील मंडळांनी सकाळी विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास सकाळी पुष्पहार अर्पण करून व सामुदायिक बुद्धवंदना घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला. ही मिरवणूक जुना एम्प्लॉयमेंट चौक, वाडिया हॉस्पिटल, चांदणी चौक, महापौर निवास, स्टेशन चौक, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक (भैय्या चौक), सुपर मार्केट, मेकॅनिक चौक, नवी पेठ, दत्त चौक, माणिक चौक, सोन्या मारुती चौक, मधला मास्ती, मंगळवार पेठ, चाटी गल्ली, बाळीवेस, तरटी नाका पोलिस चौकी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बुधवार पेठ, मिलिंद नगर येथील अस्थी मंदिरासमोर पंचाच्या चावडी येथे रात्री बारा वाजता मिरवणुकीची सांगता झाली.