मराठ्यांना ओबीसी आरक्षणात येऊ नका म्हणता, मग ओपनच्या मतदारसंघात तुम्ही का आलात? : मनोज जरांगे-पाटिल
सर्वच राजकीय पक्षांनी मला लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे आवाहन केले होते : मनोज जरांगे-पाटिल

सोलापूर : प्रतिनिधी
सर्वच राजकीय पक्षांनी मला लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे आवाहन केले होते. मी लोकसभा निवडणुकीत उभा राहिलो असतो तर प्रचंड मतांनी निवडून देखील आलो असतो. पण मला मराठा समाजाला न्याय मिळवून द्यायचाय म्हणून मी मूळ प्रश्नापासून दूर जाणार नाही, असे जरांगे म्हणाले.
मराठा समाज ओबीसीमधून आरक्षण मागत असताना ओबीसींचे सर्वच नेते मराठा समाजाला ओबीसीमध्ये घेऊ नका म्हणून विरोध करत होते. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या पण ओबीसीमधून नको असेही म्हणत होते. मग आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ओपन मतदारसंघ असताना ओबीसी नेत्यांना येथून का उभे राहायचे आहे? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. सध्या मराठवाड्यामध्ये बीडमधून पंकजा मुंडे आणि परभणीमधून महादेव जानकर हे ओबीसी उमेदवार म्हणून उभे राहिले आहेत. ज्याला पाडायचे त्याला पाडा पण तो पुन्हा कधी उभा राहता कामा नये, असे जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगे पाटील हे आज दिवसभर परभणी जिल्हा दौऱ्यावर होते. परभणीच्या यशवाडी येथे त्यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला.
जरांगे पाटील म्हणाले की, “मराठा समाजाला आरक्षणापासून ७० वर्ष या राजकारण्यांनी वंचित ठेवला आहे. मला मराठा आरक्षणासाठी काम करण्याची संधी मिळाली आहे. सहा कोटी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. शंभर दोनशे रुपये घेऊन या राजकारण्याच्या नादी लागू नका. आपल्या लेकरा बाळांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. राजकारणाच्या नादी लागू नका मराठा आरक्षणासाठी एकसंध राहा”