
सोलापूर : प्रतिनिधी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमवारी सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यांची सोमवारी, २९ एप्रिल रोजी येथील होम मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आलीय. प्रधानमंत्री मोदी यांची सुरक्षितता लक्षात घेता, आवश्यक त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. या अनुषंगाने सोलापूर शहरातील प्रमुख मार्गावर व सभास्थळ परिसरात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ प्रमाणे मनाई आदेश लागू करण्यात आला असल्याची माहिती पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी दिलीय.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी प्रचारासाठी प्रधानमंत्री मोदी यांचा सोलापूर शहरात आगमन होतंय. सोमवारी, २९ एप्रिल रोजी येथील होम मैदानात त्यांची जाहीर सभा होतेय. सोलापूर विमानतळ, दौ-याचा मार्ग, होम मैदान सभेच्या ठिकाणी, मानवी जीविताला, आरोग्याला किंवा सुरक्षिततेला धोका उत्पन्न होण्यास अथवा सार्वजनिक प्रशांतता बिघडण्यास कारणीभूत होतील अशा वस्तू, पदार्थ नेण्यास सक्त प्रतिबंध करणे तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्याकरिता ड्रोनव्दारे होणारे संभाव्य हल्ले रोखण्याकरिता, छायाचित्रणाचा दुरुपयोग टाळण्याकरिता विनापरवाना, बेकायदेशीररित्या ड्रोन प्रक्षेपण व वापर मनाई करण्याकरिता योग्य खबरदारी घेणे आवश्यक असल्याचं पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे.
त्या अनुषंगाने पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये प्रधानमंत्री यांचा दौरा ठिकाण सोलापूर विमानतळ, दौऱ्याच्या संपूर्ण मार्गावर, लगतच्या परिसरात, नियोजित सभेचे ठिकाण होम मैदान, सोलापूर या ठिकाणी २९ एप्रिल रोजीचे ००.०१ वा. ते २४.०० वा. पर्यत मानवी जीविताला, आरोग्याला किंवा सुरक्षिततेला धोका उत्पन्न होण्यास अथवा सार्वजनिक शांतता बिघडण्यास कारणीभूत होतील, अशा वस्तू, पदार्थ नेण्यास तसेच विनापरवाना, बेकायदेशीर रित्या ड्रोन प्रक्षेपण व वापर करण्यास प्रतिबंध असेल.
या आदेशाची उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अंतर्गत दंडनीय असेल, असंही पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे.