सोलापूरचे या हंगामातील सर्वाधिक तापमान ४३.७ अंशावर, वाढत्या तापमानामुळे सोलापूरकर अक्षरश: हैराण

सोलापूर : प्रतिनिधी
शहर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून तापमानात असह्य़ वाढ होऊन ते काल रविवारी या वर्षातील सर्वाधिक तापमान ४३.७ अंशांच्या घरात गेले आहे. शुक्रवार दिनांक ५ एप्रिल रोजी या हंगामातील ४३.१ अंश इतके सर्वाधिक तापमान होते. या वाढत्या तापमानामुळे सोलापूरकर अक्षरश: हैराण झाले आहेत. सकाळी नऊपासूनच उकाडा जाणवत असून यात आबालवृद्धांना अधिक त्रास होत आहे. बुधवारी २४ एप्रिल रोजी ४१.२, गुरुवारी ४१.१, शुक्रवारी ४१.२ तर काल शनिवारी, २७ एप्रिल रोजी ४२ अंशांच्या घरात गेले होते. काल रविवारी शहराचे तापमान यंदाच्या हंगामातील सर्वाधिक म्हणजे ४३.७ अंश सेल्सियस इतके वाढले आहे. गेल्या महिन्यात १६ मार्च रोजी ४०.२ एव्हढे तापमान होते तर २६ मार्च रोजी ४१.४ सर्वाधिक तापमान नोंदले गेले होते.
असह्य़ तापमानामुळे सकाळी नऊ वाजल्यापासूनच अंगाला चटके बसू लागल्यामुळे नागरिकांनी रस्त्यावरून फिरणे टाळले आहे. तर दुपारी बारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत रस्त्यावरची वाहतूक रोडावली आहे. अंगावर चटके बसू लागल्यामुळे हैराण झालेले नागरिक उन्हात कामे करणे टाळत आहेत. ऊन तथा उष्म्यापासून सुटका होण्यासाठी थंडपेयांचा आधार महत्त्वाचा वाटू लागला आहे.
डोक्यावर उन्हाळी टोप्या, खांद्यावर पांढरे गमजे घालणे पसंत केले जात आहे, तर महिलावर्ग तोंडावर स्कार्फ घालून फिरताना दिसत आहेत. परंतु ज्यांचे हातावर पोट आहे, अशा कष्टकरी व हमालांना भर उन्हात कामे करावी लागत आहेत.