तरुणांचे स्थलांतर, महिला कामगारांचे प्रश्न, नियमित पाणी, उद्योजकांचे प्रश्न, विमानसेवा ठप्प, यासह सोलापूरच्या इतर प्रश्नांवर मोदी बोलणार का.?
पंतप्रधान मोदी दहा वर्षात पाचव्यांदा सोलापुरात, तिन्ही लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त येणारे पहिलेच पंतप्रधान

सोलापूर : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकीकडे राजकीय वातावरण गरम झालेले असताना ऊन देखील वाढत आहे. आज सोलापुरात होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान नागरिकांना उन्हाचा त्रास होऊ नये याकरिता होम मैदानावर भव्य मंडप उभारण्यात आला आहे. आज सोमवारी दुपारी १२.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ होत आहे.
आजवर सोलापुरात आले ९ पंतप्रधान.
निवडणुकीनिमित्त दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी या देखील काँग्रेसच्या प्रचारानिमित्त सोलापुरात आल्या होत्या. त्यानंतर पंतप्रधान असताना राजीव गांधी यांनीही प्रचाराच्या निमित्ताने सोलापुरात सभा घेतली होती. तसेच पंतप्रधान व्ही. पी. सिंग आणि एच. डी. देवेगौडा यांच्याही सोलापुरात सभा पार पडल्या. त्यांच्या सभा होम मैदानावरच झाल्या होत्या. याशिवाय मोरारजी देसाई व अटलबिहारी वाजपेयी हे सुद्धा सोलापुरात आले होते, पण त्यावेळी ते पंतप्रधान नव्हते. तत्पूर्वी, १९६० मध्ये पंडित नेहरू सोलापुरात आले होते. मनमोहन सिंग हे देखील १ सप्टेंबर २००६ रोजी सोलापुरात आले होते, पण प्रचारासाठी नव्हे तर गोदुताई परूळेकर गृहनिर्माण वसाहतीतील १० हजार घरांच्या लोकार्पणासाठी आले होते.
सोलापूरच्या ‘या’ प्रश्नांवर मोदी बोलतील का ?
सीमेवरील सैन्याच्या गणवेश शिलाईची उद्योजकांना प्रतीक्षाच, स्मार्ट सिटी होऊनही आयटी कंपनी नाही, तरुणांचे स्थलांतर सुरूच, विडी उद्योग, गारमेंट, वस्त्रोद्योगातील महिला कामगारांचे प्रश्न कायम, सोलापूरकरांना अजूनही मिळत नाही पुरेशा दाबाने व नियमित पाणी, ‘उडान’ योजनेला १० वर्षे पूर्ण, तरीदेखील विमानसेवा ठप्पच आहे. सोलापूरच्या यासह अनेक प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलणार का याकडे सोलापूरकरांचे लागले लक्ष.