उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंढरपूरच्या अभिजित पाटील यांची सोलापुरात भेट
लोकसभेला भाजपला मदत करा आम्ही विठ्ठल कारखान्याला मदत करू : फडणवीसांचा अभिजित पाटलांना शब्द

सोलापूर : प्रतिनिधी
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी सोलापूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राज्य सहकारी बॅंकेने केलेल्या कारवाईमुळे आर्थिक कचाट्यात अडकलेला विठ्ठल कारखान्याला मदत करण्याबाबत फडणवीस हे सकारात्मक असल्याचे दिसून आले. तसेच, तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही तुम्हाला मदत करू, असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे,’ अशी माहिती अभिजित पाटील यांनी फडणवीसांच्या भेटीनंतर दिली.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर झालेल्या जप्तीच्या कारवाईबाबतचा विषय आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातला आहे. आमचं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं आहे. शेतकऱ्यांची संस्था वाचविण्याची विनंती आम्ही फडणवीस यांना केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठल कारखान्याच्या मदतीबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. कारखान्यासाठी मदत करण्याचा त्यांनी शब्द दिला आहे आणि ते आम्हाला मदत करतील, अशी अपेक्षा आहे, असेही अभिजित पाटील यांनी स्पष्ट केले.
भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याबाबत आजच्या भेटीत कोणतीही चर्चा झालेली नाही. या भेटीत केवळ कारखान्याला मदत करण्याबाबत चर्चा झाली. भाजपमध्ये जण्याबाबत आमच्या दोघांमध्ये अजून तरी कसलीही चर्चा झाली नाही, असेही अभिजित पाटील यांनी स्पष्ट केले.