वडिलांनी मागच्या ४० वर्षांत सोलापूरसाठी काहीही केलं नाही, त्यांची लेक काय करणार.?, सोलापुरात राजकीय डिजिटल वॉर
प्रणिती शिंदे यांच्या बॅनर शेजारी सचिन मस्के चे बॅनर, बॅनरच्या माध्यमातून सर्वसामान्यांना विचारला प्रश्न

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि मित्र पक्षाकडून आमदार प्रणिती शिंदे, भाजप मित्र पक्षाकडून राम सातपुते आणि अपक्ष म्हणून सचिन मस्के यांच्या प्रचाराची चर्चा सध्या सोलापुरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. लोकसभा निवडणुकीतील प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. सर्व उमेदवारांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावत आपल्या पक्षाचा तसेच अपक्ष उमेदवारांनी स्वतःचा प्रचार केला आहे. सोलापूरचा विकास करण्याची हमी देत उमेदवारांनी आपल्याला मतदान करावे असे आवाहन सोलापूरकर मतदारांना केले आहे.
प्रचारा निमित्त मतदारापर्यंत पोचता यावे यासाठी काँग्रेस, भाजप आणि अपक्ष उमेदवारांकडून सोलापूर शहरात अनेक ठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र अपक्ष उमेदवार सचिन मस्के यांच्या बॅनरची चर्चा मात्र सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात रंगल्याचे पहावयास मिळत. आमदार प्रणिती शिंदे यांच्या बॅनर शेजारीच अपक्ष उमेदवार सचिन मस्के यांचे बॅनर लागले आहेत. मस्के यांच्या बॅनर वर वडिलांनी मागच्या ४० वर्षांत सोलापूरसाठी काहीही केलं नाही, त्यांची लेक काय करणार ?’ असा मजकूर असलेले बॅनर शहरात झळकत आहेत. आमदार प्रणिती शिंदे आणि अपक्ष उमेदवार सचिन मस्के यांचे बॅनर वरील मजकूर वाचण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.