राजकीय

सहा दशकांतील काँग्रेसकाळाच्या समस्या मोदी सरकारने दहा वर्षांत संपविल्या, भाजपचा पुढचा सत्ताकाळ विकास आणि समृद्धीचा : केशव उपाध्ये (भाजप प्रदेश प्रवक्ते)

सोलापूर : प्रतिनिधी

समान नागरी कायदा, एक देश एक निवडणूक, सत्तर वर्षांवरील प्रत्येक नागरिकास मोफत उपचार, तीन कोटी लखपती महिलांसह देशातील सर्व महिलांचे सक्षमीकरण, युवकांचा कौशल्यविकास आणि रोजगाराभिमुख उत्पादन नीती, गरीबांना आर्थिक बळ देण्यासाठी पाच वर्षे मोफत धान्य, प्रत्येक घरात पाईपद्वारे गॅस जोडणी, एक कोटी घरांना मोफत सौरवीज, विनातारण आणि व्याजमुक्त कर्ज योजनेतून महिला व युवकांना उद्योगांस प्रोत्साहन, शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचे अर्थसाह्य अशा विविध योजनांतून देशाला समृद्ध करणारे भाजपचे संकल्पपत्र म्हणजे काँग्रेससारखा आश्वासनांचा केवळ कागदी पेटारा नसून मोदी की गँरंटी आहे, असा दावा प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत केला.

श्री. उपाध्ये म्हणाले, सुमारे सहा दशके देशावर सत्ता गाजवूनही काँग्रेसने देशातील गरीबी हटविली नाही. उलट दारिद्र्यरेषा गडद होत गेली. तरुणांना रोजगाराच्याच नव्हे, तर शिक्षणाच्या संधीदेखील नाकारल्या गेल्या, संविधानकर्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सातत्याने अपमान केला, आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची उपेक्षा केली, महिलांच्या उत्कर्षाच्या संधी नाकारल्या, आणि उद्योग व पायाभूत सुविधांच्या विकासाकडे दुर्लक्ष करून देश गरीब व मागासलेला राहील याचीच दक्षता घेत जगासमोर हात पसरण्याचे धोरण पत्करून जनतेलाही दुर्ब मानसिकतेत ठेवले. याउलट गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्रष्ट्या आणि विकासकेंद्री नेतृत्वामुळे, काँग्रेसने निर्माण केलेली प्रत्येक समस्या सोडवून देशाला समृद्धीचा मार्ग सापडला असून २०४७ पर्यंत जगातील सर्वात समृद्ध देश म्हणून भारत ताठ मानेने जगाचे नेतृत्व करेल असा विश्वास मोदी यांनी दिला आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे संकल्पपत्र म्हणजे देशातील प्रत्येक नागरिकाच्या अपेक्षांचे प्रतिबिंब असून प्रत्येक अपेक्षा पूर्ण करणे हा आपला संकल्प असल्याची पंतप्रधान मोदी यांची गॅरंटी आहे, असेही श्री. उपाध्ये म्हणाले.

या पत्रकार परिषदेस भाजपचे शहर सरचिटणीस पांडुरंग दिड्डी, माजी सरचिटणीस रुद्रेश बोरामणी, शहर प्रसिद्धी प्रमुख योगेश कबाडे उपस्थित होते.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!