
सोलापूर : प्रतिनिधी
मोहोळ तालुक्यातील नालबंदवाडी येथे घडलेल्या अनुराधा भिसे या विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी तिचा पती, सासरा व सासू यांचे विरुद्ध भरण्यात आलेल्या खटल्याची सुनावणी सोलापूर सत्र न्यायालयात होऊन न्यायाधीशांनी तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
या खटल्याची हकीकत अशी की, फिर्यादी परशुराम रायबाण, रा. माढा यांची बहीण अनुराधा हिचे लग्न आरोपी खंडू भिसे याचे बरोबर झालेले होते. लग्नानंतर माहेर वरून घर बांधण्यासाठी पैसे आणण्यासाठी नवरा, सासू, सासरे यांनी तिचा छळ केला व त्या छळाला कंटाळून अनुराधा हिने दि. १६.०८.२०१८ रोजी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केली असे सरकार पक्षाचे म्हणणे होते. सदर खटल्याच्या सुनावणी दरम्यान आरोपीचे वकील ॲड. जयदीप माने यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की अनुराधा हिचा मृत्यू अपघाती आहे, स्वयपाक करत असताना स्टोव्हचा भडका होऊन ती पेटली असे तिने दवाखान्यात दिलेल्या मृत्यूपूर्व जबाब स्पष्टपणे सांगितलेले आहे परंतु संशयावरून तिच्या भावाने आरोपींना या खटल्यात गुंतविले आहे, फिर्यादी पक्षाच्या विसंगती पूर्वक जबाबांवर विश्वास ठेवणे धोक्याचे आहे.
या खटल्यात आरोपींतर्फे ॲड. जयदीप माने , ॲड. प्रणित जाधव ,ॲड. वीरभद्र दासी यांनी तर सरकारतर्फे ॲड. आनंद कुर्डुकर यांनी काम पाहिले.