पंढरपुरातील धोंडोपंत दादा भजनी सांप्रदायिक फडात लाखोंचा भ्रष्टाचार उघड, मठाचे विश्वस्थ असल्याचे भासवत केला लाखोंचा अपहार
बँक मॅनेजरसह 11 जणांवर दाखल झाला 420 चा गुन्हा दाखल : नारायण सुरवसे

सोलापूर : प्रतिनिधी
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीत मानाचे स्थान असणाऱ्या पंढरपुरातील धोंडोपंत दादा भजनी सांप्रदायिक फडात दीड कोटींपेक्षा अधिक रकमेचा भ्रष्टाचार वर्ग झाल्याचे उघड झाले आहे. याविरोधात पंढरपूर प्रथम वर्ग जिल्हा न्यायालयाने इशू प्रोसेसचे आदेश देऊन आरोपी विरोधात 420 सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धोंडोपंत दादा भजनी सांप्रदायिक फडाचे अध्यक्ष नारायण त्र्यंबक सुरवसे आणि सचिव तुकाराम दळवी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तानाजी शिवाजी होळकर मु. होळे बु. ता. पंढरपूर, अरुण बापू पाटील रा. एकांबा, ता. औराद, जि. बिदर, कर्नाटक यांच्यासह एकूण 11 लोकांवर गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये भा.द.वि. कलम 406, 420, 467, 468 यासह 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत बोलताना अध्यक्ष नारायण सुरवसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंढरपूर येथील धोंडोपंत दादा भजनी सांप्रदायिक फडात जून 2012 सालापासून बेकायदेशीरपणे मठात घुसून अध्यक्ष म्हणून अरूण बापू पाटील आणि उपाध्यक्ष म्हणून तानाजी शिवाजी होळकर यांनी बोर्ड लावत वारकऱ्यांची दिशाभूल केली. त्याचबरोबर तेवढ्यावर न थांबता वारकऱ्यांकडून बेकायदेशीर पणे लाखो रुपये उकळले आहेत. 2019 साली सदर बाब फडाच्या मूळ विश्वस्त आणि वारकऱ्यांना लक्षात आल्यानंतर संस्थेचे बँक खाते गोठविण्यात आले. याबाबत अधिक माहिती घेतली असता, जून 2012 ते जुलै 2019 च्या कालावधीत बोगस अध्यक्ष अरुण बापू पाटील आणि बोगस उपाध्यक्ष तानाजी शिवाजी होळकर यांनी उस्मानाबाद जनता सहकारी बँक आणि पंढरपूर अर्बन बँकेतून जवळपास दीड कोटी रुपये काढून आर्थिक भ्रष्टाचार केला.
ही बाब उघड झाल्यानंतर सदर बोगस अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्यासह इतर आरोपी विरोधात पंढरपूर प्रथम वर्ग जिल्हा न्यायालयात खासगी तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीची दखल घेऊन न्यायालयाने पंढरपूर शहर पोलिसांना 202 प्रमाणे चौकशीचे आदेश दिले आणि त्यानंतर हा पोलिसांच्या चौकशी अहवालावरून हा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले.
यामध्ये मुख्य आरोपी अरुण बापू पाटील (रा. बिदर, कर्नाटक), तानाजी शिवाजी होळकर (मु. होळे बु. पंढरपूर), संगय्याप्पा संभय्याप्पा स्वामी (रा. कामारेड्डी, तेलंगणा), वैजनाथ मारुती माने (रा. माडज, जि. उस्मानाबाद), बालाजी विश्वनाथ कोल्हे (रा. खुटेगाव, ता. औसा, लातूर), गुंडेराव लक्ष्मण चेवले (रा. हिप्परसोगा, ता. औसा, लातूर), बाळू मच्छिन्द्र शेळके (रा. चिलाईवाडी, ता. पंढरपूर), मच्छिंद्र सुखदेव शेळके (रा. चिलाईवाडी, ता. पंढरपूर), अरुण गोपाळ ताकवणे (रा. पारगाव, दौंड), विश्वास मुकुंद देशमुख (रा. कातपूर जिल्हा लातूर) आणि तत्कालीन उस्मानाबाद जनता. सहकारी बँकेचे मॅनेजर वसंत दत्तात्रय भातलवंडे (रा. उस्मानाबाद) या आरोपींवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वास्तविक पाहता गोरगरीब वारकऱ्यांनी काबाडकष्ट करून कमावलेली रक्कम आपल्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करण्याच्या उद्देशाने मठामध्ये आणून दिलेली असते. मात्र त्याचा गैरफायदा घेऊन संबंधित आरोपींनी वारकऱ्यांचे सोंग घेऊन विश्वस्त असल्याचे भासवत सर्वसामान्य वारकऱ्यांची लूटमार केली आहे. त्यामुळे ह्या लोकांनी केलेले कृत्य हे वारकरी संप्रदायाला कलंकित करणारे आहे. त्यामुळे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे, ‘नाटाळाचे माथी हाणू काठी’ या भूमिकेतून आम्ही या भ्रष्ट लोकांविरोधात आवाज उठवला आहे. अशी माहिती नारायण शिंबक सुरवसे यांनी पत्रकार परिष देत दिली.