
सोलापूर : प्रतिनिधी
भाजप मित्र पक्षाचे लोकसभा उमेदवार आमदार राम सातपुते यांच्यासाठी सोलापुरातील कर्णिक नगरच्या लिंगराज वल्याळ मैदानावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेत भाजप युवा नेते देवेंद्र कोठे यांचे भाषण झाले होते. त्या भाषणात त्यांनी मुस्लिम धर्मियांविषयी भावना दुखावणारे विधान केले होते.
माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांच्या विरोधात मुस्ताक महबूब शेख यांनी जेल रोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. एक मे रोजी घडलेल्या गुन्ह्या प्रकरणी देवेंद्र कोठे यांच्यावर 17 मे रोजी गुन्हा दाखल झाला आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून आमदार राम सातपुते, तर काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. प्रचारा दरम्यान दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोपांचा धुराळा उडाला होता. या प्रचाराच्या दरम्यानच देवेंद्र कोठे यांनी हे धार्मिक भावना दुखावणारे विधान केले होते. याप्रकरणी त्यांच्यावर गु.र.नं. २३४/२०२४ भादविसक २९५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.