संजय राऊतांचा एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या नावाला विरोध होता, मात्र आता ते खोटे बोलत आहेत : उमेश पाटील

सोलापूर : प्रतिनिधी
एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या नावाला संजय राऊत यांचाच विरोध होता मात्र आता ते अजितदादा, सुनिल तटकरे आणि दिलीप वळसे पाटील यांचे नाव पुढे करून धांदात खोटे बोलत आहेत असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे आणि दिलीप वळसे पाटील यांची नावे घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्यावेळी उध्दव ठाकरे यांचे मुख्यमंत्री पदाचे नाव तिन्ही पक्षाच्या बैठकीत शरद पवार यांनी हात वर करून जाहीर केले होते.
शरद पवार यांनी त्यावेळी उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे नव्हते असे जाहीर सांगितले होते परंतु आता संजय राऊत हे एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या नावाला अजितदादा, सुनिल तटकरे आणि दिलीप वळसे पाटील यांनी विरोध केला. त्यामुळे नाईलाजाने उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद स्वीकारावे लागले ही चुकीची माहिती संजय राऊत देत असल्याचेही उमेश पाटील म्हणाले.
राजकारणात सर्वच गोष्टी जाहीर केल्या जात नाहीत परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, संजय राऊत आणि त्या वेळेचे आमचे वरीष्ठ नेते यांच्या मध्ये मुख्यमंत्री पदासाठी सुरुवातीच्या अडीच वर्षासाठी उध्दव ठाकरे आणि अडीच वर्षानंतर एक वेगळे नाव ठरले होते आणि त्या नावाची गोपनीयता बाळगण्यात आली होती. याबाबत पक्षातील अजितदादा, प्रफुल पटेल, सुनिल तटकरे या नेत्यांना माहिती दिली नव्हती. अडीच वर्षानंतर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार होता मात्र अजितदादा ऐवजी तो कोण असणार याची गोपनीयता ठेवण्यात आली होती. ते नाव फक्त आमचे त्यावेळचे वरीष्ठ नेते, उध्दव ठाकरे आणि संजय राऊत यांनाच माहीत होते त्यामुळे संजय राऊत यांनी खोटे बोलत असून त्यांच्या वक्तव्यावर कोणी लक्ष देऊ नये अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली.