25 वर्षे न जुळलेल्या पायाच्या फ्रॅक्चरवर रशियन इलिझारोव्ह पद्धतीने यशस्वी शस्त्रक्रिया
सोलापुरातील अस्थिरोग व इलिझारोव्ह तज्ञ डॉ.संदीप आडके यांनी यशस्वी रशियन इलिझारोव्ह पद्धतीने शस्त्रक्रिया केली

सोलापूर : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एका ५५ वर्षीय इसमाचे पंचवीस वर्षांपूर्वी रस्ते अपघातामध्ये उजव्या पायाचे घोट्याजवळ फ्रॅक्चर झाले होते. त्यावर पुण्यामध्ये तीन वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या व आत बोन ग्राफ्टिंग व पट्ट्या बसवण्यात आल्या. परंतु त्या अयशस्वी ठरवून २५ वर्षे या रुग्णाचा पाय जुळालेला नव्हता, वाकडा झाला होता व चार सेंटीमीटर छोटा झाला होता. त्यामुळे त्यांना कॅलिपर घालून चालावे लागायचे. सोलापुरातील अस्थिरोग व इलिझारोव्ह तज्ञ डॉ.संदीप आडके यांनी आडके हॉस्पिटल येथे त्यांच्या पायावर गेल्या वर्षी रशियन इलिझारोव्ह या पद्धतीने शस्त्रक्रिया करून दहा महिन्यांमध्येच यशस्वी रित्या पायाचा वाकडेपणा घालवून व चार सेंटी मीटर उंची वाढवून फ्रॅक्चर जुळवण्यात यश मिळवले आहे.
विशेष म्हणजे ही शस्त्रक्रिया केल्यानंतर चार तासातच वॉकरच्यासाह्याने त्यांनी रुग्णाला चालते केले होते. हा रुग्ण आपली सर्व दैनंदिन कामे व्यवस्थितरित्या करीत होता. ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यामध्ये भूलतज्ञ डॉ. रामचंद्र लहांडे, डॉ.डायना आडके व आडके हॉस्पिटलच्या स्टाफचे योगदान लाभले. रशियन इलिझारोव्ह ही अस्थिरोगांवरील जगातील अतिशय प्रगत उपचार पद्धती आहे. यामध्ये विना चिरफाड शरीराच्या कोणत्याही भागावर रिंगांची व वायरची प्रेम बाहेरूनच बसवली जाते व फ्रॅक्चर, मोठ्या जखमा, न जुळलेली हाडे, वाकडी हाडे, लहान मुलांचे अस्थिरोग, गुडघेदुखी, शरीराची उंची वाडवणे, हाडांना लागलेली कीड घालवणे अशा जवळपास ८०% असाध्य समजल्या जाणाऱ्या हाडांच्या रोगांवर अत्यंत प्रभावीपणे व वाजवी खर्चामध्ये उपचार करता येतात.
विशेष म्हणजे शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्णास आपला शस्त्रक्रिया केलेला हात किंवा पाय लगेचच वापरता येतो. डॉ.संदीप आडके यांनी इलिझारोव्ह पद्धतीचे प्रशिक्षण रशियातील इलिझारोव्ह सेंटर, कुरगान या ठिकाणी जाऊन घेतलेले आहे व असे प्रशिक्षण घेतलेले ते जगातील पहिले अस्थिरोग तज्ञ आहेत. आडके हॉस्पिटल, सोलापूर येथे आज संपूर्ण भारतातून इलिझारोव्ह उपचारासाठी रुग्ण येतात व जगभरातून अस्थिरोग तज्ञ याचे प्रशिक्षण घेण्यासाठी येतात.