अन्नछत्र मंडळाची पालखी परिक्रमा विदर्भात, स्वामी भक्तांकडून स्वागत, एक जूनला पालखी येणार सोलापूर जिल्ह्यात

सोलापूर : प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शना खाली व अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली २६ वर्षांपासून न्यासाकडून श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा काढण्यात येत आहे. यंदाचे हे २७ वे वर्ष असून, सहा महिन्यांपासून पालखी पादुका महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा राज्यासह आता विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात बुधवारी माहिती पालखी परिक्रमा संयोजक संतोष भोसले यांनी दिली.
न्यासाच्या वतीने अनंतकोटी ब्रह्मांडनायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी पादुकांचे दर्शन व सेवा महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील गावोगावी असलेल्या स्वामीभक्तांना लाभावी यासाठी श्री स्वामींच्या पालखी परीक्रमेचे आयोजन केले आहे.
श्री स्वामी समर्थांच्या साधू-संतत्वाची ख्याती आणि त्यांच्या भक्तीचा सुगंध सव्वाशे वर्षांपासून आहे. स्वामीभक्तांना श्री स्वामींच्या माहात्म्याची प्रचिती येऊन तद्वत त्यांच्या भक्तीची लौकिक आणि अलौकिक अनुभूती येऊन त्यांचे जीवन संपन्न बनत आहे. श्री स्वामींच्या मूळस्थान श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे श्री स्वामींच्या इच्छेनेच श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट) स्थापन झाले असून, येथे दैनंदिन दोन्ही वेळेस हजारोंच्या संख्येने स्वामीभक्त महाप्रसादाचा लाभ घेतात. अन्नछत्रातर्फे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडाविषयक, आपद्ग्रस्तांना मदत व शहरातील दिव्यांग, निराधार लोकांना समर्थ महाप्रसाद सेवा, कुस्तीगीरांसाठी खुराक, आरोग्यविषयक इतर विविध कार्यक्रम राबविले जातात. तसेच शासनाच्या विविध उपक्रमांसह राष्ट्रीय कार्यक्रमांना हे न्यास वेळोवेळी सर्वतोपरी सहकार्य करीत असते.