मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 249 बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचे निर्देश दिले होते, त्याचे काय झाले.? महापालिका कामगारांचा प्रश्न.?
पालिकेतील 249 बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा, ट्रेड युनियनचे आयुक्तांना निवेदन.

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिका महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शितल तेली उगले यांना आमदार प्रणिती शिंदे यांच्या सूचने नुसार सोमपा विविध संवर्गातील 249 बदली रोजंदारी कर्मचारी व 16 वाहन चालक यांना सेवेत कायम करण्यासाठी नगरसेवक चेतन नरोटे, बाबा मिस्त्री, प्रवीण निकाळजे, विनोद भोसले, ट्रेड युनियनचे अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले, सचिव विठ्ठल सोनकांबळे, कार्याध्यक्ष योहान कानेपागोलू, खजिनदार अरुण मेहेत्रे, राम चंदनशिवे, सतीश कांबळे, या शिष्टमंडळाने आयुक्त दालनामध्ये भेट घेऊन चर्चा करून निवेदन पत्र सादर करण्यात आले.
या निवेदन पत्रात असे म्हटले आहे की, गेली 25 ते 30 वर्ष पासून सोमपा मध्ये विविध संवर्गातील 249 बदली रोजंदारी कर्मचारी व 16 वाहन चालक हे प्रामाणिकपणे आपली सेवा बजावत आहेत या कर्मचाऱ्यांना मनपामध्ये सेवेत कायम पदावर समाविष्ट करून घेण्याबाबत तात्कालीन नगर विकास खाते मंत्री व सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार प्रणितीताई शिंदे तात्कालीन आयुक्त पी शिवशंकर व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे शिष्टमंडळ यांच्या समवेत 25 जानेवारी 2022 रोजी बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये तात्कालीन नगर विकास मंत्री व सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक खास बाब म्हणून 249 बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचे निर्देश दिले होते.
त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने दिनांक 19 मे 2023 रोजी आयुक्त शितल तेली उगले यांनी महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव सादर केला असता सदर प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे दाखल करून एक वर्ष पूर्ण होत असून मध्यंतरी या प्रस्तावासाठी सोमपातील सामान्य प्रशासन विभागातील दोन अधिकारी नगर विकास खात्याकडे या प्रकरणा बाबत पाठपुरावा करणे करिता गेले असता त्यांच्या मध्ये व नगर विकास खाते मधील अधिकाऱ्यांमध्ये काय चर्चा घडून आली किंवा या प्रस्तावातील काही अडचणी किंवा काही त्रुटी असतील त्याची आजतागायत सामान्य प्रशासन विभागाने कुठेही कार्यवाही किंवा पाठपुरावा केल्याचे दिसून येत नाही. सामान्य प्रशासन विभागाकडे ट्रेड युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी वारंवार या प्रकरणाची विचारणा केली असता याची उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.
या कालावधीमध्ये अनेक बदली रोजंदारी कर्मचारी मयत झाले असून अनेकजण सेवा निवृत्त होत आहेत हे प्रकरण नगर विकास खात्याकडे एक वर्ष प्रलंबित असून यावर कसलीही हालचाल दिसून येत नसल्याने व बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम न करून घेतल्यामुळे बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे काही कर्मचारी घनकचरा व्यवस्थापन विभागा कडे साफसफाई व घाणीचे काम असल्याने अनेक जण रोगराईने त्रस्त आहेत.
पालिका आयुक्त यांनी या प्रकरणाची योग्य ती दखल घेऊन 249 बदली रोजंदारी कर्मचारी व 16 वाहन चालक कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर सेवेत कायम समाविष्ट करून घ्यावे असे निवेदनात पत्रात म्हटले आहेत. यावेळी आयुक्तांनी योग्य तो पाठपुरावा करणार असल्याचे महामानव डॉ आंबेडकर ट्रेड युनियनच्या शिष्टमंडळाला सांगितले. काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना सोबत घेऊन नगरविकास खात्याकडे तातडीने पाठपुरावा करून या कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून देणार असल्याचे सांगितले. यावेळी ट्रेड युनियनचे पदाधिकारी व बदली रोजंदारी कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.