बुरखाधारी महिलांची सराफाकडे हातचलाखी, चौघींनी चोरले तीन दुकानांमधील १.३७ लाखांचे दागिने
गुन्हे शाखेकडून संशयित ताब्यात

सोलापूर : प्रतिनिधी
फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सिद्धेश्वर पेठेतील आरमान ज्वेलर्स दुकानांमधून चार बुरखाधारी महिलांनी हातचलाखी करून ७२ हजार रुपयांचे दागिने चोरले. दुसरीकडे अशोक चौकातील राजेश ज्वेलर्समधील ५९ हजार २०० रुपयांचे दागिने त्याच महिलांनी चोरले. तसेच सदर बझार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भारतरत्न इंदिरा नगरातील शिवकुमार ज्वेलर्स दुकानातून सहा हजार ४०० रुपयांचे चांदीचे पैंजण चोरल्याप्रकरणी खुर्शीदआलम अब्दुल समद शेख यांनी सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली.
संबंधित पोलिस ठाण्यासह शहर गुन्हे शाखेकडून या गुन्ह्यांचा शोध सुरू आहे. बुरखाधारी चार महिला १५ मे रोजी सायंकाळी सहा ते साडे सहाच्या सुमारास दागिने खरेदीच्या बहाण्याने मक्का मशिदीजवळील सिद्धेश्वर पेठेतील अरमान ज्वेलर्स दुकानात शिरल्या. दागिने पाहण्याचा बहाणा करून त्यांनी दुकानातील कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलित केले. कोणाचे लक्ष नसल्याची संघी साधून एका महिलेने हातचलाखी करून त्या दुकानातील १० ग्रॅमची नाकातील पिन (फुलाच्या आकाराच्या मोरणीचे दोन स्ट्रिप) चोरून नेली.
दुकानदाराला काही दिवसांनी ही बाब लक्षात आली. २७ मे रोजी आसिफ बशीर शेख, रा. हाजी हजरत चाळ, मुरारजी पेठ यांनी या प्रकरणी फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली. दुसरीकडे २४ मे रोजी दुपारी साडेचार वाजता त्याच बुरखाधारी महिलांनी जेलरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अशोक चौकातील राजेश ज्वेलर्समधून सोन्याचा सात ग्रॅमचा पत्ता व मणी, साडेसातशे मिलीग्रॅमचे सोन्याचे बदाम, एक ग्रॅमची सोन्याची काडी हातचलाखीने लांबवली. या प्रकरणी राजेश अंबादास पेंडम, रा. साईबाबा चौक, न्यू पाच्छा पेठ यांनी जेलरोड पोलिसांत फिर्याद दिली. दुकानातील त्यांच्या वडिलांचे लक्ष विचलित करून त्या महिलांनी दागिने लंपास केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.