जुनी मिल ट्रस्टच्या जागेतील बेकायदा बांधकामे व्यवसायां विरोधात तक्रार, ट्रस्ट च्या सभासदांची ९ जून रोजी सभा : डॉ. संदीप आडके

सोलापूर : प्रतिनिधी
जुनी मिल नावे सोलापुरात ओळखल्या जाणाऱ्या जुनी मिल बेकार कामगार, वारसदार आणि जनहित संघर्ष समिती सोलापूर या ट्रस्टच्या जुनी मिल कंपाऊंड, कंबर तलाव, हीरज रोड, जुनी पोलीस लाईन, धरमसी लाईन अशा विविध पाच ठिकाणी उच्च न्यायालयाकडून घेतलेल्या जागा आहेत. परंतु नगर भूमापन कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संगनमताने खोट्या कागदपत्रावर कुमार करजगी यांनी बोगस उमा सहकारी गृहनिर्माण संस्थेची नॉमिनी म्हणून नावे लावून नागरिकांची फसवणूक चालवलेली आहे. या ठिकाणी अस्तित्वात असलेली सर्व बांधकामे ही अवैध आहेत व लेआउट निष्काषीत करण्यात आलेली आहेत.
या जागांमधील सर्व व्यवसाय अवैध पद्धतीने चालू आहेत. या ठिकाणी बऱ्याच शैक्षणिक संस्था अवैधरीत्या सुरू आहेत या सर्वांची तक्रार जुनी मील ट्रस्टचे सचिव डॉ.संदीप आडके यांनी जिल्हाधिकारी यांना नुकतीच केलेली आहे. याच जागेत अवैधरित्या सुरू असलेल्या नागेश करजगी आर्किड स्कूल येथे एक व दोन जून दरम्यान जिल्हास्तरीय बाल महोत्सवाचे आयोजन केलेले आहे तसेच नुकतेच जुनी मिल कामगार वारसदारांना या जागेमध्ये घरे बांधून देणार अशा अफवा पसरवल्या जात आहेत.
नागरिकांनी आपल्या पाल्यांना अशा बेकायदा ठिकाणच्या कार्यक्रमांमध्ये पाठवू नये तसेच येथील शाळांचे भवितव्य धोक्यात आहे व नागरिकांनी फसगत करून घेऊ नये. या जुन्या मिलच्या जागे बाबतीत कोणीही व्यवहार करू नयेत अशा सक्त ताकीद धर्मादाय आयुक्त व उच्च न्यायालयातर्फे देण्यात आलेले आहेत. या जागेत केलेल्या घोटाळ्याबद्दल कुमार करजगी व सुरेंद्र कर्णिक यांचा जामीन रद्द होण्याच्या बेतात आहे.
नगर भूमापन कार्यालयातील हा घोटाळा लवकरच बाहेर काढणार आहोत व जुनी मिल ट्रस्टच्या सभासदांची या जागेतील प्लॉट वितरणा बाबत ट्रस्टने रविवार ९ जून रोजी संध्याकाळी ५ वाजता समाज कल्याण केंद्र, रंगभवन, सोलापूर येथे सभा आयोजित केलेली आहे असे जाहीर प्रसिद्धीकरण जुनी मिल ट्रस्ट तर्फे करण्यात आलेले आहे.