संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिकी कराडला मुख्यआरोपी करून मोक्कानुसार कारवाई करा : ॲड.योगेश पवार

सोलापूर : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात दहशत माजविणारा व्हाईट कॉलर गुंड वाल्मिकी कराड, सुदर्शन घुळे व विष्णु चाटे व अन्य साथीदार यांची संघटित गुन्हेगारी टोळी असून याचा प्रमुख वाल्मिकी कराड हा आहे. वाल्मिकी कराड व टोळीविरुध्द बीड जिल्ह्यात खून, खुनाचा प्रयत्न करणे, स्वत:च्या फायद्या साठी लोकांचे अपहरण करून खंडण्या उकळणे या सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. वाल्मिकी कराडच्या प्रचंड दहशतीमुळे सर्वसामान्य लोक त्यांचेविरुध्द तक्रारी देण्यास धजावित नाहीत.
वाल्मिकी कराड टोळीतील सदस्यांनी पवनचक्की कंपनीकडून करोडोची खंडणी उकळण्याचा केलेला प्रयत्न मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख व ग्रामस्थांच्या विरोधामुळे निष्फळ झाला. त्यावेळी कंपनीच्या सुरक्षा रक्षकांस वाल्मिकी कराडच्या गुंडांनी मारहाण करून त्यास खल्लास करण्याचा प्रयत्न केला. याबाबत पोलिसांत तक्रार देवूनसुध्दा पोलीस अधिकार्यां नी सराईत गुन्हेगार वाल्मिकी कराडच्या दहशतीला व राजकीय दबावाला बळी पडून पोलिसांनी तक्रारीची गांभिर्याने दखल घेतली नाही. त्यामुळेच वाल्मिकी कराड याच्या सांगणेवरून संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली.
संतोष देशमुखांच्या हत्येचे मुख्य कारण खंडणी प्रकरण असून खंडणी प्रकरण व त्यानंतरच्या हत्येचा मास्टरमाइंड व मुख्य आरोपी वाल्मिकी कराड हाच आहे. कारण वाल्मिकी कराडने पवनचक्की व्यवस्थापकांस जीवे मारण्याची धमकी देवून खंडणी मागितली व वाल्मिकी कराड यांचे सांगणेवरुनच दहशत बसवून खंडणी मागण्यासाठी हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी हे मस्साजोग येथे गेले होते. तिथे त्यांनी सुरक्षा रक्षकांस मारहाण केली आणि वाल्मिकी कराड यांचे नांव सांगून खंडणी मागितली. तेव्हा मस्साजोगच्या ग्रामस्थांनी व सरपंच संतोष देशमुखांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, कराडच्या गुंडांनी संतोष देशमुख यांस धक्काबुक्की केली. त्यामुळे ग्रामस्थांनी प्रतिकार म्हणून कराडच्या गुंडांना धक्काबुक्की करून कंपनीतून हाकलून लावले. त्याच रागातुन वाल्मिकी कराडच्या सांगणेवरूनच घुले, चाटे यांनी देशमुखांची हत्या केली.
मस्साजोगच्या ग्रामस्थांनी व संतोष देशमुखांनी बीडचा तथाकथित बॉस धनंजय मुंडेचा खास वाल्मिकी कराडच्या गुंडांना धक्काबुक्की केल्याचा विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. वाल्मिकी कराडच्या गुंडांना धक्काबुक्की झाली अन वाल्मिकी अण्णाने काहीच केले नाही, असा चुकीचा संदेश बीड जिल्ह्यात जावून कराडची दहशत कमी व्हायला नको, म्हणून वाल्मिकी कराड याने पोलिस प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचार्यांझना हाताशी धरले आणि टोळीतील ज्यांना धक्काबुक्की झालेली होती, त्या गुंडाना उचकावून धक्काबुक्की घटनेचा बदला घेण्याच्या दृष्टहेतूने व कटकारस्थानाने संतोष देशमुखची हत्या करण्यास टोळीतील सुदर्शन घुले, विष्णु चाटे यांसह अन्य गुंडांना वाल्मिकी कराड याने प्रवृत्त केले.
सुदर्शन घुले, विष्णु चाटे व अन्य गुंडांनी लोकांच्या मनात दहशत बसविण्यासाठी थंड डोक्याने कट रचून, संतोष देशमुखची हत्या करण्याच्या हेतूने टोल नाक्यावर गाडी अडवून संतोष देशमुखचे दिवसाढवळ्या अपहरण करून निर्घुण हत्या केली. यामागचा मास्टरमाइंड वाल्मिकी कराड असल्यामुळे देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिकी कराड यांस मुख्य आरोपी करण्याचे आदेश द्यावेत. सदर हत्येमुळे वाल्मिकी कराड व टोळीची दहशत महाराष्ट्रभर गेली. म्हणून वाल्मिकी कराडच्या गुन्हेगारी कृत्यांना पायबंध घालणे गरजेचे आहे. त्यामुळे वाल्मिकी कराडवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्याचे आदेश द्यावेत.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखमुळे खंडणी मिळण्यास आडकाठी येत असल्याचे लक्षात आल्याने वाल्मिकी कराड याने संतोष देशमुखचे अपहरण करून हत्या करण्याचा कट केला आणि त्यांच्या टोळीतील सुदर्शन घुले, विष्णु चाटे यांसह अन्य गुंडामार्फत संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या केली. गुन्हा करण्या अगोदर व गुन्हा करतेवेळी आणि संतोष देशमुखांची हत्या केल्यानंतर या हत्येत सहभागी असणारे सर्व आरोपी हे वाल्मिकी कराड यांचे संपर्कात होते. त्यामुळे या हत्येचा मुख्य सुत्रधार वाल्मिकी कराड हाच असून देशमुख हत्येप्रकरणी त्याला मुख्य आरोपी करावे.
वाल्मिकी कराड हा राजकीय वरदहस्त असलेला गुंड प्रवृत्तीचा सराईत गुन्हेगार असून स्वत: वाल्मिकी कराड व टोळीतील सदस्य हे अत्यंत क्रूर, खुनशी व गुंड प्रवृत्तीचे असून त्यांची बीड जिल्ह्यात प्रचंड दहशत आहे. कराड टोळीविरुध्द खून, खुनाचा प्रयत्न करणे, स्वत:च्या फायद्यासाठी लोकांचे अपहरण करून खंडण्या मागणे, यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. वाल्मिकी कराड व टोळीतील सदस्य हे गुंड, खुनशी आणि कायद्याचे ज्ञान असणारे गुन्हेगार प्रवृत्तीचे व राजकीय वलय असणारे आहेत. गुंड वाल्मिकी कराड याला कायद्याबदलची कोणतीही, कसलीही भीती राहिलेली नाही. त्यामुळे बीड जिल्ह्यात सामाजिक शांतता धोक्यात आलेली आहे. वाल्मिकी कराड हा खंडणी केसमध्ये सध्या फरार आहे.
वाल्मिकी कराड व टोळीतील सदस्य हे स्वत:च्या आर्थिक व राजकीय फायद्यासाठी जाणीवपूर्वक व सराईतपणे गुन्हेगारी कृत्य करतात. गेल्या 10-15 वर्षापासून वाल्मिकी कराड व त्यांचे सहकारी हे बीडमध्ये गुन्हेगारी कृत्य किंवा जमावाने भांडण-तंटे करून समाजात व सर्वसामान्याच्या मनात भीती व दहशत निर्माण करीत आहेत. वाल्मिकी कराड व टोळीतील सदस्यांचे गुन्हेगारी कृत्य व पार्श्वभूमी बघितल्यास त्यांचे कृत्य हे संघटित गुन्हेगारीचे आहे. वाल्मिकी हा कराड टोळीचा म्होरक्या व संघटित गुन्हेगारी कृत्याला मार्गदर्शन करून गुन्हेगारीस प्रोत्साहन देणारा प्रमुख व्यक्ती आहे. स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वाल्मिकी कराड व त्यांचे सहकारी कोणत्याही स्थराला जावून कटकारस्थाने करून गुन्हेगारी कृत्य करतात. त्यामुळे वाल्मिकी कराड व टोळीकडून सातत्याने होणारे संघटित गुन्हेगारीकृत्य रोखण्यासाठी वाल्मिकी कराड व टोळीच्या गुन्हेगारी कृत्याविरुध्द बीएनएसच्या कलमाखाली नियंत्रण ठेवणे कठीण आहे. त्यामुळे मोक्कानुसार कारवाई करावी.
वाल्मिकी कराड व टोळीतील सदस्यांचा गुन्हेगारी अहवाल तयार करून कराड टोळीविरुध्द मोक्का नुसार कारवाई करण्याचे आदेश द्यावेत. वाल्मिकी कराड हा खंडणी केसमध्ये फरार असल्यामुळे देशमुखच्या केसमधील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व देशमुख कुटुंबियांच्या जीवित्तास, कराड टोळी व त्रयस्थ व्यक्तीकडून धोका आहे. वाल्मिकी कराड व त्याच्या टोळीतील काही सदस्यांकडे गावठी पिस्तोल असल्याची विश्वसनीय माहिती आहे. त्यामुळे वाल्मिकी कराड व टोळीतील त्रयस्थ व्यक्तींकडून धोका असल्याने देशमुख कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्यावे.