गोवंशीय प्राण्यांची अवैधपणे कुर्बानी नकोच पोलिस आयुक्त, शहर काझी धर्मगुरू मशिदीच्या विश्वस्तांची बैठक

सोलापूर : प्रतिनिधी
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कोणीही कोणत्याही प्रकारच्या गोवंशीय प्राण्यांची अवैध वाहतूक करणार नाही आणि गोवंशीय प्राण्यांची अवैधपणे कुर्बानी देणार नाही, याची सर्वांनी सक्त नोंद घ्यावी, असे पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी गुरुवारी झालेल्या बैठकीत स्पष्ट केले.
बकरी ईदच्या अनुषंगाने गुरुवारी पोलिस आयुक्तालयात शांतता कमिटीच्या सदस्यांसह शहरातील शहर काझी, मुस्लीम धर्मगुरू, प्रमुख मशिदीचे विश्वस्त, प्रमुख ईदगाह मैदानाचे विश्वस्त यांची बैठक पार पडली. यावेळी पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी पोलिस उपायुक्त अजित बोऱ्हाडे, डॉ. दीपाली काळे, विजय कबाडे, सहायक पोलिस आयुक्त राजन माने, अजय परमार, यशवंत गवारी, प्रांजली सोनवणे, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदिप मोरे, महापालिकेचे अधिकारी मठपती, सहायक आयुक्त, पशुसंवर्धन विशाल येवले, पशू चिकित्सक भरत शिंदे आदी उपस्थित होते.
पोलिस आयुक्त म्हणाले, गोवंशीय जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना कळवावे. कुर्बानीनंतर सार्वजनिक ठिकाणी रस्त्यांवर किंवा उघड्यावर रक्त, मांस पडणार नाही, याची सर्वांनी खबरदारी घ्यावी. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, काही आक्षेपार्ह मेसेज, फोटो, व्हिडिओ आल्यास तो पुढे प्रसारित न करता डिलीट करून जातीय सलोखा राखावा, कोणतीही अनुचित घटना किंवा प्रकार आढळल्यास पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन करीत कोणीही कायदा हातात घेवू नये, सणादिवशी योग्य तो बंदोबस्त लावला जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.