सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

पवार इज पावर, मास्तरांचा पावर गेम, शहर मध्यच्या रणनीतीला मास्तरांची सुरुवात

माकप राज्यात १२ विधानसभा जागा लढवू इच्छित असून शरद पवारांशी सकारात्मक चर्चा

सोलापूर : प्रतिनिधी

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रतिनिधी मंडळाची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी भेट घेऊन अनेक विषयावर चर्चा केली. लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रतिनिधी मंडळाने महाविकास आघाडीचे व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुंबईत भेट घेतली.

प्रतिनिधीमंडळात डॉ. अशोक ढवळे, डॉ. उदय नारकर, माजी आमदार नरसय्या आडम, मा. आ. जे. पी. गावीत, आ. विनोद निकोले, डॉ. डी. एल. कराड, डॉ. अजित नवले, एम. एच. शेख, व डॉ. सुभाष जाधव हे होते. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मिळविलेल्या प्रचंड यशाबद्दल आणि त्यातील शरद पवार यांच्या असामान्य योगदानाबद्दल माकपच्या नेतृत्वाने पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांचे हार्दिक अभिनंदन केले.

लोकसभा निवडणुकीत माकप, किसान सभा, सीटू व इतर जनसंघटना यांनी राज्यभर केलेल्या उत्तम कामाचे, आणि कामगार व शेतकऱ्यांसाठी ते करत असलेल्या सातत्याच्या संघर्षांचे शरद पवार, जयंत पाटील यांनी विशेष कौतुक केले.

आगामी विधानसभा निवडणूक तयारीबाबत त्यांनी माकपच्या शिष्टमंडळासोबत ५५ मिनिटे चर्चा केली. माकप राज्यात लढवू इच्छित असलेल्या १२ विधानसभा जागांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली. पर्यायी धोरणे, जाहीरनामा व निवडणूक रणनीती याबाबतही चर्चा झाली. यासंबंधीचे एक निवेदन माकपतर्फे सादर करण्यात आले.

दूध प्रश्नाबाबत हस्तक्षेप करण्याची आवश्यकता शरद पवार यांनी प्रकर्षाने व्यक्त केली. येत्या विधानसभा सत्रावर कामगारांच्या मोर्चाची चर्चा झाली. महाविकास आघाडीच्या इतर सर्व प्रमुख नेत्यांना माकपचे प्रतिनिधीमंडळ लवकरच भेटणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!