“तू मेरी औरत को नंदानेको भेजती के नहीं” असे म्हणत सासुचा खुन करणा-या गुड्डु जावयास जन्मठेपेची शिक्षा

सोलापूर : प्रतिनिधी
सदर प्रकरणाची हकीकत अशी की, फिर्यादी हे संगमेश्वर नगर अक्कलकोट रोड, सोलापूर येथे कुटुंबियां सोबत एकत्र राहणेस असून फिर्यादी हे व्यवसायाने वकील आहेत. यातील मयत मुमताज यांना तीन मुली व एक मुलगा असून त्यातील समरीन नावाची मुलगी हिचा आरोपी नामे मोहम्मद शरिफ उर्फ गुड्डु चांदपाशा पटेल याच्या सोबत घटनेच्या १० वर्षांपूर्वी प्रेम विवाह झालेला होता. लग्ना नंतर आरोपी व मयताची मुलगी समरीन यांच्यात सतत किरकोळ कारणांवरुन वाद होत होता. म्हणून चार वर्षापूर्वी आरोपी व त्याच्या पत्नीने शहर काझी यांचे मार्फत तलाक घटस्फोट घेतला होता. तेंव्हा पासून घटनेच्या दोन महिने आधी पर्यंत मयताची मुलगी म्हणजे आरोपीची पत्नी ही फिर्यादीच्याच घरी राहत होती. त्यानंतर ती नोकरी करु लागली व हॉस्टेल मध्ये राहण्यास गेली. तिच्या घटस्फोटानंतर (तलाक) आरोपी मोहम्मद शरिफ उर्फ गुड्डु चांदपाशा पटेल हा तिला परत नांदायला ये म्हणून त्रास देत होता. तेव्हा फिर्यादीने आरोपीस समजावून सांगितले होते. त्याचा राग मनात धरुन आरोपीने फिर्यादीला जानेवारी २०१८ मध्ये मारहाण केलेली होती. त्यावेळी सदर आरोपी मोहम्मद शरिफ उर्फ गुड्डु चांदपाशा पटेल विरुध्द फिर्यादीने एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन सोलापूर येथे गुन्हा देखिल नोंदवला होता.
सदर घटनेदिवशी दिनांक ०४ ऑक्टोंबर २०२१ रोजी यातील फिर्यादी नेहमी प्रमाणे आपल्या वकील कामकाजानिमीत्त कोर्टामध्ये गेले असता त्यावेळी फिर्यादीच्या घरी फिर्यादीची पत्नी व त्याची आई मयत मुमताज या होत्या. त्यावेळी संध्याकाळी ०५.०० वा. सुमारास यातील आरोपी हा फिर्यादीच्या घरी मोटार सायकलवर आला. त्या वेळी त्याच्या हातात लोखंडी रॉड होता. त्या लोखंडी रॉडने आरोपी हा फिर्यादीच्या घराची नासधूस व तोडफोड करीत होता. हा आवाज ऐकून फिर्यादीची पत्नी बाहेर आली व आरोपीला नासधूस व तोडफोड करण्यासापासून अडवू लागली. तेंव्हा आरोपी हा काही ऐक ऐकूण घेण्याच्या मनस्थितीत नव्हता व म्हणत होता की, “मेरी सास को बाहर बुलाओ” हा आवाज ऐकून यातील मयत मुमताज या घरातून बाहेर आल्या त्यावेळी आरोपीने मयत मुमताज हिला विचारले की, “तू मेरी औरत को नंदानेको भेजती के नहीं” असे म्हणले असता मयताने नकार दिला. या गोष्टीचा राग येवून आरोपीने क्षणाचाही विलंब न करता यातील मयत मुमताज हिच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली. यात मयत या गंभीर जखमी झाल्या व त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होवू लागला. त्यानंतर आरोपी मोहम्मद शरिफ उर्फ गुड्डु चांदपाशा पटेल याने मोटार सायकल घटनास्थळी टाकून लोखंडी रॉड घेवून पळून जावून एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे येथे स्वतः हजर झाला. सदरची घटना फिर्यादी च्या घराशेजारील मित्राने फिर्यादीला फोन करुन सांगितले व यातील मयत यांना त्यांच्या सून व इतर शेजारील लोकांनी मिळून सोलापूर येथील मार्कंडेय हॉस्पीटल येथे दाखल केले. यातील मयतावर ०४ व ०५ ऑक्टोबर २०२१ रोजी उपचार व शस्त्रक्रिया झाल्या. परं परंतु यातील मयत मुमताज हिला आरोपीने केलेल्या मारहाणीत डोक्यामध्ये मोठी जखम झाल्याने ती ०६ ऑक्टोबर रोजी मयत झाली. त्यांनतर फिर्यादी याने सदर आरोपी विरुध्द दिनांक ०४ ऑक्टोंबर २०२१ रोजी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन, सोलापूर येथे रितसर तक्रार दाखल केली. सदर प्रकरणाचा तपास करुन पोलीसांनी मा. न्यायालयामध्ये आरोपी विरुध्द दोषारोपपत्र दाखल केले.
सदर कामी शासनातर्फे एकूण पंधरा साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी, पंच, घटनास्थळचा पंचनामा, मयताचे कपडे, नेत्र साक्षीदार, वैदयकिय अधिकारी, यातील तपासिक अधिकारी, नोडल ऑफिसर व घटनास्थळाचे फोटो काढणारे फोटो ग्राफर, पोलीस स्टेशन मधील सी.सी.टी.व्ही. फुटेज व आरोपीने सदर गुन्हा केलेली कबूली एका साक्षीदाराकडे घटना घडल्या घडल्या लगेच फोन करुन सांगितली याबाबत सरकारी साक्षीदाराने न्यायालयामध्ये दिलेली साक्ष या सर्वांचे जबाब महत्वाचे ठरले.
यात जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग राजपूत यांनी केलेला युक्तीवाद असा की, सदरच्या निर्घृण पणे मारहाणीत यातील मयत यांस त्यांची काहीही चुक नसताना आरोपीने निव्वळ संशय व सूड भावनेने मयतास डोक्यामध्ये जबर मारहाण व शिवीगाळ केली व त्यावेळी फिर्यादीचे पत्नी आरोपीस समजावून सांगत असताना त्यांनासुध्दा शिवीगाळ केली. तसेच आरोपीच्या वकीलांचा बचाव असा होता की, मयत ह्या वयोवृध्द असल्याने त्या फियादीच्या राहत्याघरी चक्कर येवून पडल्यावर त्यांना डोक्यास फरशीचा जबर मार लागला असेल त्यांचा मृत्यु झाला असे न्यायालयामध्ये सांगितले. परंतु जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग राजपूत यांनी न्यायालयामध्ये सिध्द करुन दाखवले की, मयत मुमताज पिरजादे यांचा मृत्यु आरोपीने आणलेल्या लोखंडी रॉडने डोक्यात जबर मारहाण केल्यामुळेच झाला आहे व त्यासाठी शवविच्छेदन अहवाल न्याय वैदय शास्त्र प्रयोगशाळेचा अहवाल, आरोपीचे अंगावर घटनेच्यावेळी असणाऱ्या कपड्यावरील रक्ताचे डाग, जप्त हत्यार लोखंडी रॉड त्यावरील रक्ताचे डाग, मयताचा रक्त गट, निवेदन पंचनामा, पोलीस ठाणे येथे आरोपी स्वतःहून लोखंडी रॉड घेवून हजर झालेला सी.सी.टी.व्ही. फुटेज व इतर पंचनामे इत्यादी भक्कम पुरावा आरोपीविरुध्द न्यायालयात सरकार पक्षाचे वतीने सादर करुन युक्तीवाद करण्यात आला. त्याप्रमाणे सदरचा युक्तीवाद ग्राहय धरुन श्रीमान एम. एस. आझमी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, सोलापूर यांनी आरोपी मोहम्मद शरिफ उर्फ गुड्डु चांदपाशा पटेल यास खून केल्याप्रकरणी भा.दं.वि. कलम ३०२ प्रमाणे जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच रक्कम रुपये १०,०००/- दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच दंड न भरल्यास तीन महिने सक्त कारावासाची शिक्षा. तसेच भा.दं.वि. कलम ३२३ प्रमाणे आरोपीस एक महिन्याची कारावासाची शिक्षा. तसेच भा.दं.वि. कलम ४२७ प्रमाणे आरोपीस सहा महिन्याची कारवासाची शिक्षा व एक हजार रुपये दंड. दंड न भरल्यास एक महिना साध्या कारावासाची शिक्षा सुनावली
सदर प्रकरणात सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग राजपूत यांनी काम पाहिले तर आरोपीच्या वतीने अॅड. बडेखान यांनी काम पाहिले. तसेच यातील तपासिक अंमलदार म्हणून पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिद एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन, सोलापूर यांनी सदर गुन्हाचा तपास केला. तसेच कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हवालदार प्रविण जाधव यांनी काम पाहिले.