ATS ने केली अटक मिळाली पोलिस कोठडी, नीट प्रकरणी सोलापुरातील शिक्षक संजय जाधव निलंबित

सोलापूर : प्रतिनिधी
लातूरमधील नीट पेपर फुटीप्रकरणी अटकेतील टाकळी टें., ता. माढा येथील शिक्षक संजय जाधव, रा. बोथी तांडा, ता. चाकूर, जि. लातूर याच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या आदेशाने निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिली.
नीट पेपर फुटीप्रकरणी शिक्षक जाधव याला एटीएसने अटक केली आहे. त्याला पोलिस कोठडी मिळाली आहे. या कारवाईबाबत एटीएसने बुधवारी ई मेलने जिल्हा परिषद प्रशासनाला कळविले होते. त्याच्या पोलिस कोठडीला ४८ तास उलटले आहेत. प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी गुरुवारी सायंकाळी जाधव याच्या निलंबनाचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्याकडे पाठविला होता. त्यांच्या आदेशानुसार जाधव याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
दरम्यान, माढ्याचे गटशिक्षणाधिकारी विकास यादव यांच्या समितीने चौकशी करून अहवाल प्राथमिक शिक्षणाधिकारी शेख यांना सादर केला आहे. तो १२ जून पासून बेकायदा शाळेवर गैरहजर राहिल्याचे त्यात नमूद केले आहे. त्याचीही जिल्हा परिषद प्रशासनाने गंभीर दखल घेत ही कारवाई केली आहे. निलंबन कालावाधीत त्याचे मुख्यालय माळशिरस राहणार आहे.