माऊलींच्या पालखी तळावर चिखल, वारकऱ्यांची मुक्काम ठिकाणी दुरावस्था, प्रशासनाची तात्पुरती मलमपट्टी

सोलापूर : प्रतिनिधी
तरडगाव परिसरात पाऊस झाल्याने पालखी तळ चिखलमय झाला होता. वारक-यांना राहुट्या लावणेही अशक्य झाले होते माऊलींची पालखी जेथे मुक्कामी थांबते तेथेही चिखल झाला होता. सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ, व्यवस्थापक माऊली वीर यांनी तळाला भेट देवून प्रशासनाला सुचना केल्या.
या परिसरात मुरुम टाकल्याने तळ मजबुत झाला याच तळावर सोहळा विसावला. अनेक वर्षे पाऊस मोठा झाल्यानंतर राहुट्यात देखील पाणी येते वारकऱ्यांना दिवसभर चालायचे आणि रात्री पावसामुळे बसून रात्र जागून काढायची याची जणू सवय झाली आहे. मात्र याची तक्रार कोणाकडेही न करता माझा वारकरी विठ्ठल भेटीच्या आशेने चालत राहतो आणि त्या वारकऱ्यास विठ्ठल नेहमीच पाठीराखा म्हणून उभा असतो.
तरडगाव पालखी तळावरील दृश्य मनाला भावणारे होते भर पावसात माऊलीच्या जयघोषात आरती सुरू होती. आभाळातून मृग बरसत होता तर दुसरीकडे देहभान विसरलेला वारकरी आनंद अश्रूंनी माऊलींचा जयजयकार करत होता. याची देही याची डोळा हा सोहळा पाहताना वारकरी ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता तल्लीन झाला होते.
खऱ्या अर्थाने विठ्ठल भेटीची आस लागलेला वारकरी हा शासनाच्या मदतीची अपेक्षा न बाळगता वर्षानुवर्षे मजल दरमजल करीत पांडुरंगाच्या भेटीला, दर्शनाला येत असतो. लाखो वारकरी यात सहभागी होतात परंतु दरवर्षी वारकऱ्यांना भेडसावणारे प्रश्न आजही जसेच्या तसे दिसतात, काही प्रश्न सुटले असले तरी अद्याप काही प्रश्न मात्र तसेच आहेत.
महाराष्ट्र शासनाचे, सरकारचे कर्तव्य आहे की श्रद्धेने लाखो वारकरी चालत पांडुरंगाच्या दर्शनाला येतात त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये याची खबरदारी घेणे प्राधान्य क्रमाने आवश्यक आहे परंतु अनेक घोषणा होतात अंमलबजावणी मात्र 30 टक्केच होते.
ज्याचा पाठीराखा साक्षात पांडुरंग आहे त्याला शासनाच्या अथवा कोणाच्याही मदतीची अपेक्षा नसते याचे उदाहरण म्हणजे आळंदी, देहू येथून पायी चालत येणारे वारकरी म्हटले तर वावगे ठरणार नाही. प्रशासन आणि सरकार मधील नेते आणि अधिकाऱ्यांमधील जेव्हा वारकरी जागा होईल तेव्हा मात्र वारी मार्गातील एकही समस्या राहणार नाही.
वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये अशीच अपेक्षा ज्येष्ठ आणि युवा वारकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.