चांदोबाचा लिंब येथे रिमझीम पावसाच्या सरी अंगावर झेलीत माऊली माऊली चा जयघोष, पालखी सोहळ्यातील पहिले उभे नेत्रदीपक रिंगण संपन्न

सोलापूर : प्रतिनिधी (तरडगांव)
आषाढी वारीने श्री विठ्ठल भेटीस निघालेला कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा मजल दरमजल करीत दोन दिवसापुर्वी लोणंद मुक्कामी पोहोचला होता. अडीच दिवसाच्या लोणंद मुक्कामी माउलींच्या दर्शनासाठी कर्नाटक राज्यासह कोल्हापूर, सातारा, सांगलीसह कोकण भागातील लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. आळंदी ते लोणंद हा वाटचालीतील अर्धा टप्पा पुर्ण करुन सोमवारी हा सोहळा दुपारी १:३० वाजता तरडगावकडे मार्गस्थ झाला. ढगाळ वातावरणात वारक -यांची वाटचाल सुखकर होत होती. टाळ मृदुंगाच्या साथीने भजनात रंग भरला होता मध्येच येणारी पावसाची सर वाटचालीत उत्साह निर्माण करीत होती. वारक-यांची पावले पहिल्या उभ्या रिंगणासाठी चांदोबाचा लिंबकडे पडत होती. पोलिसांनी वाहतुक व्यवस्था सुरळीत केल्याने तसेच लोणंद नगरपंचायतीने अडीच दिवस आरोग्य, वीज, पाणी पुरवठा आदी सुविधा व्यवस्थित पुरविल्याने वारक-यांना कोठेही त्रास झाला नाही.
फलटण तालुक्यात स्वागत
माउलींच्या पालखी सोहळ्याने अडीच वाजता कापडगांव येथे फलटण तालुक्यात प्रवेश केला. येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, आ दीपक चव्हाण, प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार डॉ अभिजीत पाटील यांच्यासह प्रशासनाने सोहळ्यासह वैष्णवांचे स्वागत केले .
अश्वांची नेत्रदीपक दौड
पहिल्या उभ्या रिंगणासाठी माउलीचा मोती व स्वाराचा हिरा अश्व दुपारी ३:३० वाजता चांदोबाचा लिंब येथे पोहोचले. त्यानंतर आपल्या वैभवी लवाजम्यासह लाखोंचा दळभार घेवुन माउलीचा रथ सायंकाळी ४ वाजता पोहोचला. उध्दव चोपदार यांनी रस्त्याच्या दुतर्फा दिंड्या उभ्या केल्या. भोसरीच्या राजश्री भागवतने रांगोळ्याच्या सुंदर पायघड्या घातल्या आणि सायंकाळी सव्वाचार वाजता रिमझीम पावसाच्या सरी अंगावर झेलीत अश्वांनी माउली माउली नामाच्या जयघोषात नेत्रदीपक दौड सुरु केली. अश्वांच्या नेत्रदीपक दौडीने लाखो भाविकांच्या डोळ्याचे पारणे फिटले. अश्व रथा मागील ३२ दिंड्यांपर्यंत धावले रथाजवळ आल्यावर अश्वानी माउलींचे दर्शन घेतले. प्रमुख विश्वस्थ ॲड राजेंद्र उमप व विश्वस्थ भावार्थ देखणे यांनी रथाचे सारथ्य केले. आरतीनंतर पावसातच दिंड्या दिंड्यामध्ये विविध खेळ रंगले सायंकाळी सोहळा तरडगाव मुक्कामी पोहोचला.